दरेगाव -नांदुरी ते कळवण रस्त्यावर ठिकठिकाणी वळण व चढउताराचा रस्ता आहे. तेथे वळण सरळ करण्यासाठी संधी असताना दुर्लक्ष झाले आहे. चढ उताराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी समोरून येणारे वाहन लक्षात येत नाही तेथे भराव करुन किंवा चढ कमी करुन रस्ता सरळ व सुरळीत करण्याची आवश्यकता असताना आवश्यक व अपेक्षित ती कामे केली गेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
सप्तशृंग गडावर कोरोनामुळे शुकशुकाट
कळवण :
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तशृंग निवासीनीच्या सप्तशृंगी गडावर दर्शन बंद असल्यामुळे शुकशुकाट जाणवत असून अर्थचक्र थांबले आहे. सप्तशृंगी गडावर कोणतेही इतर उपजीविकेचे साधन नसल्याने अर्थचक्र पूर्णतः थांबले असून वर्षभरात दोन यात्रोत्सव व दैनंदिन येणाऱ्या देवीच्या भाविक-भक्तांमुळे अनेकांच्या हाताला येथे काम मिळते. फुले, प्रसाद, खण-नारळ विक्रेता, पार्किंग, हॉटेल व्यवसाय करणाऱ्या अनेकांसाठी सप्तशृंग गड म्हणजे पोटापाण्याची सोय आहे. मात्र कोरोनाचा कहर सुरू झाला आणि सप्तशृंग गडावरील व्यावसायिकांचे जगणेच 'लॉक' झाले आहे.
हेमांडपंथी महादेव मंदिरांची पडझड
कळवण : तालुक्यातील मार्कंडपिंप्री व देवळीकराड येथे हेमांडपंथी महादेव मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. हेमांडपंथी मंदिरांची पडझड झाली असून पुरातन विभागाने या मंदिरांची सुधारणा करावी अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे. महाशिवरात्री निमित्ताने मार्कंडपिंप्री व देवळीकराड येथे नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून शिवभक्त दर्शनासाठी येतात. पुरातन विभागाने या मंदिरांची सुधारणा करावी ही गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे.
शिरसमणी ते साकोरे रस्ता दुरुस्तीची मागणी
कळवण :
शिरसमणी-साकोरे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या मार्गाने होणारी शेतमाल वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर ह्या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
शिरसमणी ते साकोरे हा तीन किलोमीटरचा रस्ता असून शिरसमणी, दह्याणे, कुंडाणे, भुसणी, ओतूर, जिरवाडे या गावातील शेतकरी आपला भाजीपाला व कांदा विक्रीसाठी वणी व नाशिक येथील बाजार समितीमध्ये घेऊन जाण्यासाठी मुख्यत्वे याच रस्त्याचा वापर करतात. रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे या रस्त्याने होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे.