देवळाली कॅम्प : भगूरमार्गे नानेगावला जाणारा मुख्य रस्ता बंद करण्याचा लष्कर प्रशासनाचा निर्णय रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. ब्रिटिशपूर्व काळापासून नानेगावला जाण्या-येण्यासाठी भगूर मरिमाता मंदिरासमोरील रस्ता वापरात येत आहे. विजयनगर येथे लष्कराने नवीन इमारत बांधण्याकरिता त्या ठिकाणी दगडी भिंतीचे कम्पाउंड बांधण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. यामुळे नानेगावला ये-जा करण्याचा मुख्य रस्ता बंद होणार असल्याने ग्रामस्थांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. याबाबत नानेगाव येथील मारूती मंदिरात बुधवारी सकाळी सरपंच हिराबाई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत भगूरहून नानेगावला येणारा रस्ता बंद करू नये म्हणून लष्करी विभागाला निवेदन देण्यात आले असून, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नसल्याचे विलास आडके यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी नानेगावला येणारा मुख्य रस्ता बंद झाल्यास जनआंदोलनासह वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. सदर रस्ता दोन किलोमीटर अंतराचा असून, लष्कराने जागेचे हस्तांतर केल्यानंतर नानेगाव रस्त्यातील फक्त सातशे मीटर रस्ता हा लष्करी जागेतून जाणार आहे. पूर्वीपासून रस्ता आहे तसाच असून, लष्कराने नंतर जागा हस्तांतर केल्याने रस्त्याचा काही भाग लष्कराच्या हद्दीत गेल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी सांगितले. ग्रामसभेला उपसरपंच केशव गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, विलास आडके, माजी सरपंच संजय आडके, अशोक आडके, तानाजी भोर, प्रमोद आडके, ज्ञानेश्वर काळे, भाऊसाहेब चौधरी, नवनाथ शिंदे, गेणू शिंदे, परसराम आडके, पंडित रोकडे, गोटीराम रोकडे, रामदास शिंदे, योगेश काळे, विजय काळे, उत्तम आडके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.एक मुखी निर्णय भगूरमार्गे नानेगावला जाणाºया रस्त्याचा वापर ७-८ हजारांहून अधिक ग्रामस्थ व मळे भागातील रहिवासी करतात. त्यामुळे नानेगावचा मुख्य रस्ता बंद करण्याचा निर्णय लष्कर प्रशासनाने मागे घ्यावा, असा एकमुखी निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. याबाबत प्रांत अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आले.
नानेगावला जाणारा रस्ता लष्कराकडून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:05 AM