बाबा बोरसे, साकोरा : रस्ता खराब असल्याने गावात पाण्याचा टॅँकर येत नाही म्हणून एका दुष्काळी गावातील ग्रामस्थांनी थेट तहसिलदाराचेच अपहरण करुन त्यांच्याकडे टॅँकरची मागणी करणारी कथा ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकातून नाशिकचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी मांडलेली आहे. याच कथेशी साधर्म्य दर्शविणारी परंतु अपहरणासारखा प्रकार नव्हे तर रस्त्याची दुरुस्ती स्वत: करुन गावातील महिलांनी पाण्याच्या टॅँकरसाठी रस्ता मोकळा करुन दिल्याची आदर्शवत आणि जबरदस्त इच्छाशक्तीचे दर्शन घडविणारी कथा नांदगाव तालुक्यातील कोकणवाडा येथील महिलांनी वास्तवात घडविली आहे.गेल्या वीस वर्षापासून साकोरा ते कोकणवाडा रस्ता खराब स्थितीत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे टँकर गावात येऊन पोहोचू शकत नाही. नांदगाव तालुक्यात सर्वत्र रस्त्यांची जोरदार कामे सुरू असतांना साकोरा -कोकणवाडा ते डॉक्टरवाडी रस्ता मात्र दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यावेळी नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच गैरसोयीचा सामना करावा लागतो. साकोरा ग्रामपंचायत अंतर्गत सदर रस्ता येतो. या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झालेले आहे. सध्या या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मुक्या जनावरांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. कोकणवाडा गावात शासनाने पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी शासनदरबारी अनेकवेळा करूनही केवळ रस्ता खराब असल्याचे कारण सांगून आजपर्यंत एकही टँकर येथे उपलब्ध करुन दिलेला नाही. टॅँकरसाठी केवळ रस्ता आडवा येतो म्हटल्यावर गावातील सर्व महिला एकत्र आल्या आणि श्रमदानाने रस्ता दुरुस्तीचा निर्णय घेतला. त्यानुसार, महिलांनी आपल्या मुलाबाळांसह रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. रस्त्यावर उखडलेली खडी बाजूला केली. उन्हातान्हात राबत रस्त्याची सफाई केली. रस्ता दुरुस्तीसाठी यावेळी कोकणवाडा येथील ठकुबाई पवार, वंदना महाले, सिमा दिवे, रंगुबाई घोगर, सकुबाई पागे, गंगुबाई घुगसे, लक्ष्मीबाई गवळी, इंदूर दरवडे, आशाबाई घाटाळ, पारूबाई डोळे, सुल्याबाई महाले, सारिका मानभाव, शोभा दिवे, सागर घाटाळे, रोहित दिवे, बबलू डोळे, सुरज डोळे, समृद्धी डोळे, सरला गावित, नंदिनी घोगर, राणूबाई घुगसे, तानूबाई वळवी, लखन वळवी, संजय वळवी, मथ्याबाई डोळे, जमनाबाई दरवडे, नर्मदा महाले, सुशिला कोते, जयश्री डोळे, मंगल कोते, सोनाली डोळे, हिराबाई भोये, रोहीत दिवे, आरती बरफ आदी महिला पुढे सरसावल्या. रस्ता मोकळा केल्यानंतर आता तरी गावात पाण्याचा टॅँकर येईल याची आस महिलांना लागून राहिली आहे. शासनातील अधिकाऱ्यांकडून आता त्याची कितपत दखल घेतली जाईल याची प्रतीक्षा आहे.
पाण्याच्या टॅँकरची मागणी
पाण्याचा टॅँकर गावात यावा यासाठी महिलांनी स्वत: तीन किलोमीटरचा रस्ता दुरूस्त केला आणि याबाबत गटविकास अधिकारी जे. टी. सुर्यवंशी यांच्याशी संपर्कसाधून पाण्याच्या टॅँकरची मागणी केली. यावेळी सूर्यवंशी यांनी टँकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.