नाशिक: पेठपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगणी फाट्याजवळ ग्रामीण वाहतूक शाखेचे पाच ते सहा वाहतूक पोलीस नियमितपणे अवजड वाहनांवर कारवाई करीत होते. यादरम्यान शनिवारी (दि. ३०) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नाशिकहून जाणाऱ्या एका भरधाव ट्रक-ट्रेलरला हाताने थांबण्याचा इशारा केला असता वाहनचालकाने पोलिसांच्या नाकाबंदीकडे दुर्लक्ष करत त्याच्या ताब्यातील ट्रेलर वाहन न थांबविता पोलीस नाईक कुमार गायकवाड (वय ४९,रा.आडगाव) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत चाकाखाली सापडून गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली.एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असून ग्रामीण भागात अपघातांची वाढती समस्या पोलीस व आरटीओ प्रशासनाची डोकेदुखी बनत चालली आहे. शनिवारी झालेल्या या दुर्घटनेमुळे रस्ता सुरक्षा अभियानालाच गालबोट लागले आहे. वांगणी गावाच्या फाट्यावर नाशिक येथून पेठमार्गे बडोद्याकडे राजू रोडलाईन्स ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रेलर (क्र.एम.एच २३ एयू १४४१) भरधाव जात होता. जिल्हा वाहतूक शाखेच्या वाहनाजवळ कर्तव्यावर उभे असलेले गायकवाड यांना त्या वाहनावर संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबविण्याचा इशारा केला ; मात्र ट्रकचालक व मालक संशयित राजू विक्रम गरजे (वय ४२,रा.बीड) याने त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गायकवाड यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ पोलिसांनी संशयित ट्रकचालक राजू यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नियमितप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांचे फिरते पथक वांगणी नाक्यावर थांबून मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत होते. दुपारी दुर्घटना घडण्यापूर्वी जवळपास १३ वाहनचालकांवर पथकाकडून कारवाई करण्यात आली होती. संशयित गरजे याने ट्रेलरवरील नियंत्रण सोडून देत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना हुलकावणी देऊन गायकवाड यांना जबर धडक दिली. या धडकेत गायकवाडे हे अवजड ट्रेलरच्या चाकाखाली सापडून गंभीररित्या जखमी झाल्याने जागीच गतप्राण झाले.दरम्यान, गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते मागील २८ वर्षांपासून नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.---गायकवाड यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यु झाला. या घटनेने ग्रामिण पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलाकडून तातडीचे अर्थसहाय्य त्यांच्या कुटुंबियांना दिले जाणार असून अनुकंप तत्वावर कुटुंबापैकी एका वारसदाराला नोकरीत समावून घेतले जाईल. संपुर्ण ग्रामिण पोलीस दल गायकवाड कुटुंबियांच्यासोबत आहे.- भिमाशंकर ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पेठ
रस्ता सुरक्षा अभियान : अवजड ट्रेलरने वाहतूक पोलिसाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 9:34 PM
गायकवाड मागील २८ वर्षांपासून नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे
ठळक मुद्देपेठमधील वांगणी फाट्याजवळ दुर्घटना