स्मार्ट रोडवरील पार्किंगची समस्या
नाशिक : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्मार्ट रोडवर सध्या पार्किंगची समम्या भेडसावत आहे. या परिसरात अधिकृत पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक पदपथावर वाहने उभी करीत आहेत. असलेल्या वाहनतळाचा वापर होत नसल्याने महापालिकेने पार्किंगच्या समस्येतून मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.
उपनगर मार्गावर गतिरोधकाची गरज
नाशिक : उपनगर मार्गावर नुकतेच डांबरीकरण करण्यात आल्याने हा मार्ग वाहनधारकांसाठी सुलभ झाला आहे. या मार्गावरील मार्केट, रहिवासी क्षेत्र असल्याने नव्याने डांबरीकरण झालेल्या मार्गावर गतिरोधकाची आवश्यकता आहे. विशेषत: टाकळीकडे जाणारा मार्ग तसेच शांतिपार्ककडे जाणाऱ्या मार्गाजवळ गतिरोधकाची गरज आहे.
फुले महामंडळाच्या चौकशीची मागणी
नाशिकरोड : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या कारभाराची सखोल चौकशी होऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगारांतर्फे करण्यात आली आहे. या महामंडळाच्या योजना आणि कर्ज प्रकरणांबाबतची माहिती समोर येत नसल्याने लाभार्थी वंचित राहत असल्याची तक्रार आहे. काही ठराविक लोक मात्र लाभासाठी दबाव टाकत असल्याचीही चर्चा आहे.