कळवण : कळवण शहरातील शाळा, महाविद्यालय व एस. टी. बसस्थानक परिसरात रोडरोमिओ व टपोरीगिरी करणारे उपद्रवी वाढले असून, पोलीस प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. शिवाय दुचाकींचा रेस खेळतात असे उद्योग वाढले आहेत. शाळा, महाविद्यालय सुटल्यावर रोडरोमिओ मुलींचा पाठलाग करतात व त्यांची छेडछाड करतात. त्यामुळे कळवण पोलिसांनी या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी पुढे आली असून, रोडरोमिओंवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय पगार, सचिन पगार, सुजित हिरे, समर्थ रौंदळ, सुमित रोकडे, पवन पगार, राज देवघरे आदी विद्यार्थी उपस्थित होते . विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालय परिसरात काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.बुधवारी पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी एस. टी. बसस्थानक, महाविद्यालय व शाळा परिसरात सकाळपासून बंदोबस्त ठेवत मोहीम राबविली. शिवाय वाहतूक पोलिसांनी रोडरोमिओंच्या दुचाकींना आडकाठी घातली. शहरातील महाविद्यालय व शाळा परिसरात व एस. टी. बसस्थानक परिसरात पोलिसांची या रोडरोमिओंवर कारवाई झाल्याशिवाय त्यांच्यात सुधारणा होणार नाही, असे मत प्रा. किशोर पगार यांनी व्यक्त केले. दुचाकींच्या शर्यतींमुळे नागरिकांना त्रास शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या काळात रोडरोमिओ व टपोरीगिरी करणारे आढळून येतात. याच वेळेत एकाच रस्त्यावरून अनेक वेळा चकरा मारणाºया दुचाकीस्वारांना अडवून त्यांची तपासणी करावी. चौकशीत या भागात त्यांचे नेमके काय काम आहे याची विचारणा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला असून, मुलींची छेडछाड करून त्यांना त्रास देत आहेत. शाळा व एस. टी. बसस्थानक परिसरात रोडरोमिओ व टपोरीगिरी करणारे दुचाकी वाहने भरधाव चालवत असून, त्यांच्या रेस लावण्याच्या व कर्णकर्कश हॉर्न वाजवण्याच्या प्रकारामुळे इतरांना खूपच त्रास होतो आहे.
कळवण शहरात रोडरोमिओंचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:19 PM