इगतपुरी तालुक्यातील भाम धरण परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाम धरणामुळे निरपन, भरवज, दरेवाडी, सारुक्ते वाडी, बोरवाडी, गुलाब वाडी गावांचे स्थलांतर होऊन पुनर्वसन झालेलं आहे. परिसरातील मांजरगाव मुख्य रस्ता ते जुन्या निरपन गावठाण पर्यंत रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीरपणे संपादित करून त्या जागेतून डांबरी रस्त्याचे काम पूर्ण न करताच अर्धवट सोडून दिले आहे. धरणाच्या चारही बाजूंनी शेतकरी असुन शेतकऱ्यांसाठी रस्ता होणे गरजेचे असताना अद्यापही दरेवाडी बोरवाडी हा ऱस्ता झालेला नसल्याने येथील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जंगलातुन शेतात जावे लागत आहे.
निरपण व भरवज रस्ता पुर्ण झालेला नसून या रस्त्याचे काम अपूर्ण झालेले आहे. खडी डांबर टाकून रस्ता पूर्ण केलेला आहे परंतु सदर रस्त्याला जोडण्यासाठी दोन पुल होणे गरजेचे आहे त्या पुलाचे काम झालेले नाही. येथील शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी रोज ये जा करण्यासाठी जंगलातून पायी चालत जावं लागतं असल्याने जंगलातील प्राणी साप, बिबट्या असे अनेक प्राण्यांपासून त्यांना रोजच संकटातून प्रवास करावा लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर फळ झाडे व इतर उपयुक्त झाडेही मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. त्या झाडांची भरपाई मिळण्यासाठी झाडांची संख्या मोजणे आवश्यक होते. परंतु अधिकाऱ्यांनी झाडांची मोजणी न करता त्यांच्या सोयीनुसार त्यांना वेळ मिळेल तेव्हा कामगारांच्या मदतीने झाडे कापून रस्त्यासाठी जागा करून त्या जागेवर अर्धवट डांबरी रस्ता देखील तयार केला आहे. रस्ता करतेवेळी उर्वरित जागेचे नुकसान होणार नाही अशी काळजी घेणे गरजेचे होते परंतु याउलट शेतीमधील जी फळ झाडे, व इतर उपयोगी झाडे होती त्यांचे नुकसान केले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या जमिनीचा सुद्धा वापर न करता येण्यासारखी अवस्था करून ठेवली आहे.
शेतकऱ्यांनी सन. २०२० पासून ते आतापर्यंत अनेक वेळा कार्यकारी अभियंता नांदूरमधमेश्वर प्रकल्प विभाग नाशिक, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वैतरणा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आणि मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांना लेखी अर्ज दिलेले आहेत. घोटी पोलीस ठाण्यात शेतातील झाडे बेकायदेशीर तोडले त्याबद्दल लेखी अर्ज सुध्दा दिलेला आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी अनेक वेळा लेखी स्वरूपात देखील संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भाम धरण परिसरातील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिन संपादीत केली आहे. संबधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना या जमीनीचा मोबदला देऊन रस्ता पुर्ण करावा अन्यथा येथील धरणग्रस्त शेतकरी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील असा इशारा सिताराम गावंडा यांनी दिला आहे.