लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची कामे सुरू असतात. या कामांवर असलेल्या मजुरांना कामाच्या ठिकाणीच एका कोपऱ्याला निवारा करून राहावे लागते. मात्र, या मजुरांना पाणी, शौचालयासारख्या प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने या मजुरांची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात जॉगिंग ट्रॅक, रस्ता खोदकाम, नाल्याची कामे केली जातात. या कामांसाठी मजुरांना अनेक दिवस कामाच्या ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे त्यांना जवळच झोपडी किंवा पाल ठोकावी लागते. डीजीपी नगर येथील जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी आलेल्या मजुरांनाही अशाचप्रकारे वास्तव्य करावे लागत आहे. त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.
या मजुर कुटुंबातील लहान मुले आणि महिलांना उघड्यावरच राहावे लागते. पाण्याचा शोध घ्यावा लागतो. गत थंडीत या मजुरांना उघड्यावरच रात्र काढावी लागली. त्यामुळे अशा कुटुबांकडे लक्ष देण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे.
(फोटो:१४ जाॅगिंग ट्रॅक नावाने)
---कोट---
गोरगरीब मुजरांना शहरात कुणाचाही आधार मिळत नाही. ज्यांच्याकडे हे मजूर कामाला आहेत ते ठेकेदार तसेच महापालिकेकडूनही या मजुरांच्या हिताचे रक्षण केले जात नसल्याचे दिसते. महापालिकेने अशा कामांच्या ठिकाणी असलेल्यांना आधार देण्याची गरज आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- कर्नल सहानी, ज्येष्ठ नागरिक, डीजीपी नगर.