नाशिक- मराठा आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका मांडून माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुणे शहरात आंदोलन केले. आंदोलन करताना भुजबळ यांना अटक झाल्याने अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील पाथर्डी फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले.
सुमारे अर्धातास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
ओबीसी आरक्षण बचावा संदर्भात विविध मागण्यांसाठी पुणे शहरात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने समीर भुजबळ यांच्यासह आंंदोलकांनी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या मांडत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे नाशिकमध्ये या अटकेचा निषेध करण्यात आला.आंदोलनात अंबादास खैरे, मकरंद सोमवंशी, मुख्तार शेख, मुकेश शेवाळे, अमर वझरे, रवींद्र शिंदे, अमोल आव्हाड, जय कोतवाल, मुकेश शेवाळे, योगेश देसले, हर्षल चौधरी,पुष्पा राठोड, सुजाता कोल्हे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.