सटाणा : शहरातील साठफुटी रस्त्यावर भरणाºया बाजारात धूमस्टाइल दुचाकीचालकांनी धुमाकूळ घातला आहे. भरबाजारात बेदरकारपणे दुचाकी चालविल्यामुळे महिलांमध्ये घबराट निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होतात. पालिका प्रशासनाने धूमस्टाइल दुचाकींना ब्रेक लावण्यासाठी या रस्त्यावर ठिकठिकाणी रबर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या साठफुटी रस्त्यावर रविवार ते शुक्रवार डेली भाजीपाला बाजार भरतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. दुपारी ४ वाजेनंतर या रस्त्यावर भाजीपाला खरेदीसाठी महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र वर्दळीचे ठिकाण असतानाही काही टवाळखोर भर बाजारात भरधाव दुचाकी चालवून महिलांमध्ये भीती निर्माण करतात. या गोंधळात दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत. अपघात व टवाळखोरांना रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ या भाजीपाला बाजारात रबरी गतिरोधक बसवावेत अशी मागणीसाठी माजी नगराध्यक्ष सुमनबाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी हेमलता डगळे यांची भेट घेऊन केली आहे. मुख्याधिकारी डगळे यांनी निवेदनाची दखल घेत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी यशवंत कात्रे, राम पवार, अमित पगार, दादू सोनवणे, हिरामण येवला, दिनेश सोनवणे, गणेश भामरे, रवींद्र शिंदे, अरुणा जाधव, संध्या सोनवणे, मंगला सोनवणे आदी उपस्थित होते.महिलांमध्ये असुरक्षितता; बंदोबस्ताची मागणीशहरातील साठफुटी रस्त्यावर धूमस्टाइल टवाळखोरांबरोबरच रोडरोमिओंनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. बाजारात येणाºया महिलांशी भाजीपाला घेण्याचा बहाणा करून अश्लील चाळे करणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सर्रासपणे सुरू असून, महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसेच रात्री अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावर रोडरोमिओंचा धुमाकूळ सुरू असतो. तरुणींची छेड काढणे असे प्रकार राजरोज सुरू असून, बदनामी होऊ नये म्हणून अनेक महिला व तरु णी हे प्रकार पोलिसांना सांगत नसल्याचे बोलले जात आहेत. या परिसरात गस्तीसाठी पोलीस चौकी उभारावी, अशी मागणीही सोनवणे यांनी केली आहे.
सटाणा शहरातील साठफुटी रस्त्यावर रोडरोमिओंचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:19 AM