पुरुषोत्तम राठोड,
घोटी : इगतपुरी तालुक्यात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होते हे सर्वश्रुत आहे. तरीही या ठिकाणच्या रस्त्यांचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची वाट लागते; परंतु ही वाट लागण्याचे कारण पाऊस नाही तर निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याने दरवर्षी महामार्गासह तालुक्यातील विविध रस्ते डोकेदुखी बनले आहेत.
दरवर्षी मोठंमोठे खड्डे पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यापूर्वीच उन्हाळ्यात संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांचे तसेच महामार्गाचे काम होणे गरजेचे असूनही हेतुपुरस्सर स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा डोळेझाक करत आहे. मुंबई - आग्रा महामार्गावर मोठंमोठ्या खड्ड्यांमुळे कित्येक नागरिकांचा बळी घेतला आहे, तर बहुतांश अधू झाले आहेत. या महामार्गावरील टोल प्रशासन सुस्त बसले असून, रस्त्यांची दुरुस्ती न करता टोलवसुलीत दंग दिसत आहेत. इगतपुरी तालुक्याला जोडणाऱ्या ठाणे, पालघर, नगर जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्ग मुंढेगाव ते कसारा घाट, इगतपुरी शहरातील जुना महामार्ग, घोटी - पिंपळगाव मोर ते भंडारदरा तसेच अस्वली ते नांदूरवैद्य, मुंढेगाव ते अस्वली या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली असून, अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध लहान-मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाट काढणे मुश्कील झाले आहे.
तालुक्यातील प्रमुख महामार्ग जर खड्ड्यात असेल तर इतर रस्त्यांची स्थिती काय असेल याची कल्पना न केलेली बरी ! मुंबई-आग्रा महामार्गावर गोंदे फाटा ते कसारा घाटापर्यंत विविध ठिकाणी महामार्गाची चाळण झालेली आहे. महामार्गावरील खड्डे तसेच रस्ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल भरू नका, असा आदेश खासदार हेमंत गोडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. मनसेसुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात होती. त्यानंतर टोल प्रशासनाला जाग आली आणि डागडुजी करण्यास सुरुवात केली; परंतु रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकले जात असल्याने उलट अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे
इन्फो
रस्ते काँक्रिटीकरणास मान्यता
घोटी-भंडारदरा मार्गांतर्गत पिंपळगाव मोर, वासाळीदरम्यानचा रस्ता पर्यटन व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या मार्गावर महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई, अलंग-मलंग- कुलंगगड आहेत. टाकेद, खेडभैरव मंदिर, भंडारदरा धरण अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा मोठा राबता असतो. मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यातून येणारी - जाणारी वाहतूक दररोज सुरू असते. या मार्गावर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याने राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी वारंवार तीन वर्षांपासून सलग दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. नुकतीच त्या रस्त्याला हिरवी झेंडी मिळाली असून, १४ कि.मी.चा पिंपळगाव मोर ते वासाळी ९८ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.
फोटो- २० इगतपुरी खबरबात
200821\20nsk_8_20082021_13.jpg
फोटो- २० इगतपुरी खबरबात