नितीन बोरसे
सटाणा : बागलाण तालुका हा म्हणायला आदिवासी तालुका आहे. मात्र, लागून गुजरात राज्य आणि जिल्हा नाशिक असल्यामुळे या शेतीप्रधान तालुक्यातील जनता व्यापारी शेतीकडे आकर्षित झाली आहे. पारंपरिक शेतीला मूठमाती देऊन व्यावसायिक शेतीकडे हा तालुका वळला आहे. त्यामुळे साहजिकच दळणवळणाच्या बाबतीत जनतादेखील जागृत असल्याचे बघायला मिळते. त्यामुळेच मुख्य रस्ता असो वा ग्रामीण रस्ते यांची झालेली दुरवस्था याला अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र आघाडी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत जनतेने संबंधित यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात बसविल्याचे चित्र समोर आहे.
बागलाण हा संवेदनशील तालुका आहे. सोशल मीडियामुळे जग गतिमान झाले आहे. त्यामुळे सटाणा शहराचा बाह्य वळण रस्ता असो वा शिर्डी-साक्री रस्त्याचे चौपदरीकरण याबाबत संधिसाधू मंडळींनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे आजही जनतेच्या मनात आहे; परंतु घोडा मैदान जवळ असल्यामुळे केलेल्या ‘बनवाबनवी’ला नक्कीच तोंड द्यावे लागणार आहे. बागलाण तालुका हा गुजरात राज्याला लागून असल्यामुळे साहजिकच गुजरातला जाण्याचा जवळचा मार्ग म्हणून येथील राष्ट्रीय आणि राज्य मार्ग विकसित होत आहे; परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः कोलमडला आहे. तांत्रिक गोष्टींचा अभाव आणि अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या गुणवत्ता नसलेल्या कामामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी दहिवेल ते मंगरूळ फाटा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्यामुळे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊन या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. दुरुस्तीसाठी आंदोलने झाली; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेचे पितळ उघडे पडले. पिंपळनेर -ताहाराबाद-सटाणादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्ताहीन कामामुळे आज तरी दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे.
नामपूर-सटाणा रस्त्याचे कामदेखील संथगतीने...
नामपूर-सटाणा रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. हा दहा मीटर रुंदीचा रस्ता ठिकठिकाणी काँक्रीटचा रस्ता व गटारी बांधण्यात येत आहे. कुपखेडा ते चौगाव फाटा रस्त्याचे काम झाले असले तरी पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने कामाची गुणवत्ता उघड झाली आहे. यंत्रणेला नामपूर ते कुपखेडा रस्त्याचे काम अद्याप करता आलेले नाही, त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्डे टाळण्याच्या नादात अपघाताची मालिका सुरू आहे. अशी परिस्थिती असतानाही यंत्रणेकडून साधी डागडुजीदेखील करण्यात आलेली नाही. या रस्त्यावरील तब्बल ३४ शेतकरी मोबदल्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांशी ना संवाद साधला ना कोर्टात आपली बाजू मांडली. या उदासीन धोरणामुळे जनतेचे मात्र नुकसान होताना दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दुरवस्था...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः वाट लागली. वीरगाव ते दसाणे, वीरगाव ते तळवाडे दिगर, मोरकुरे ते पठावे, मुल्हेर ते बोऱ्हाटे, मानूरचे बारा पाडे, हरणबारी ते आंबापूर या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वर्दळीचे रस्ते असल्यामुळे मोठी ओरड आहे. जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडात असल्याची अधिकाऱ्यांची ओरड आहे. पैसे नसल्याच्या नावाखाली बहुतांश रस्ते दुर्लक्षित असून, त्याचा परिणाम ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेवर होताना दिसत आहे.
फोटो - १७ सटाणा-चौगाव रस्त्याची झालेली दुर्दशा.
170821\17nsk_1_17082021_13.jpg
सटाणा-चौगाव रस्त्याची झालेली दुर्दश