सिडको : नव्याने झपाट्याने विकसित होणाऱ्या उंटवाडी परिसरात विविध समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले असून, परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. परिसरातील अनेक पथदीप बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.संततधार पावसाने परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्त्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले ैअसून, दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच रात्रीच्या वेळी कालिका उद्यान परिसर सोडला तर संपूर्ण रस्त्यावर चारच पथदीप सुरू आहेत. वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित लक्ष देत नाहीत.गेल्या तीन-चार दिवसांपासून कालिका पार्क, श्रीराम रो-हाऊस, साईराम रो-हाऊस, तिडकेनगर आदी परिसरातील पथदीप बंदच असतात. परिसरात भटक्या गायी व श्वानांची संख्याही मोठी आहे. रात्रीच्या वेळी श्वान मोठमोठ्याने भुंकत असल्याने व वाहनाचालकांवर धावून जात असल्याने रहिवाशांत कायम दहशत असते.कालिका पार्क, श्रीराम पार्क, साईराम परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, दुर्गंधी येत आहे. थंडीतापाच्या साथीने अनेक आबालवृद्धी आजारी आहेत. संबंधितांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.मुख्य रस्त्यावर केवळ चारच पथदीप सुरू!कालिका गार्डनपासून ते नव्याने झालेल्या कमल ब्लॉसमपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर केवळ चारच पथदीप सुरू असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. काही रस्ते कॉँक्रीट झाले असले तरी ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. लोकप्रतिनिधी कधीच परिसरात फिरकत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी भटक्या गायी व श्वान बसलेले असतात. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिलांना रस्त्यावरून जीव मुठीत धरूनच जावे लागते. याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे.रस्ते, पथदीप बंद, भटकी जनावरे आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. तक्रार करूनही कुणी लक्ष देत नाही. त्यामुळे परिसरात अनेक समस्या तशाच आहेत. याबाबत मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात वारंवार तक्रार केली तरीही दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे.- रहिवासी
उंटवाडी परिसरातील रस्त्यांची वाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:58 AM