आडगाव : पंचवटीमधील प्रभाग ३ मधील रासबिहारी-मेरी लिंकरोडवर असलेला चक्रधरनगर परिसर विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत समस्यांबरोबरच अन्य नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या परिसरातील कच्च्या रस्त्यामुळे नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पंचवटीमधील प्रभाग ३ मधील चक्रधरनगर परिसरातील डीपीरोड व कॉलनीरोड अजूनही कच्चे असल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे लहान मुले व महिलांचा पाय घसरून व मोटारसायकल स्लीप होऊन पडण्याच्या घटना नित्याच्या आहेत. शिवाय या रस्त्यावर कायम पाणी साचलेले असते त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असल्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. चक्रधरनगर, साईधामनगर ही मोठी नागरी वसाहत आहे मात्र, अनेक वर्षांपासून येथे मुलांना खेळण्यासाठी उद्यान व मोकळे मैदान नसल्याची नागरिकांची तक्रार आहे, तशी अनेक वेळा मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
चक्रधरनगरातील रस्ते रूतले चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:05 AM