नाशिकरोड : नाशिकरोडच्या पूर्व भागातील रेल्वेस्थानकापलीकडे नव्याने व वेगाने विकसित होत असलेल्या चेहेडी पंपिंग परिसरात कागदावरील रस्ते कागदावरच राहिल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मोठमोठ्या निवासी संकुलांकडे जाणारे रस्ते अद्याप छोटे व कच्च्या मातीचे आहेत.चार प्रमुख रस्ते असलेल्या नाशिकरोडचा विकास गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाल्याने मुक्तिधामच्या पाठीमागून आर्टिलरी सेंटरपर्यंत जयभवानी रोड परिसरात झपाट्याने शेती, मळे विभागात सीमेंटचे साम्राज्य उभे राहिले. त्याचबरोबर बिटकोपासून नांदूर नाक्यापर्यंत दुतर्फा जेलरोड परिसर विकसित झाला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे. जेलरोड परिसराचा विकास जवळपास पूर्णपणे झाल्याने गेल्या १०-१२ वर्षांपासून नाशिकरोडच्या पूर्व भागातील रेल्वेस्थानकापलीकडील चेहेडी पंपिंग या मळे भागात सीमेंटचे जंगल उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. गुंठेवारी पद्धतीमुळे रोहाउस स्कीम, खासगी जागेतील पक्की घरे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी रहिवासी संकुलाचे मोठमोठे प्रोजेक्ट या भागात पूर्णत्वास नेले आहेत. तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे; मात्र या ठिकाणी असलेला जुना चेहेडी रस्ता हा कागदावर १०० फुटी असला तरी प्रत्यक्षात तो छोटा आहे. तसेच प्रसाद धुनीकडून येणारा चेहेडी शिवरोडदेखील डीपी प्लॅनप्रमाणे नाही. तर रहिवासी संकुलाच्या मोठमोठ्या प्रोजेक्टला परवानगी मिळाली; मात्र तेथे जाण्यासाठी असलेले रस्ते हे पूर्वीप्रमाणेच शेती, मळ्यातील कच्च्या रस्त्याप्रमाणेच छोटे आहे. कॉलनी रस्त्याचेदेखील रुंदीकरण झालेले नाही. झपाट्याने सीमेंटचे जंगल व लोकवस्ती वाढत असून, त्यामानाने रस्त्याचे जाळे विणले गेलेले नाही. मनपाने रस्त्यासाठी जागा आरक्षित केली आहे; मात्र त्याचा मोबदला दिला न गेल्याने ती जागा मनपाच्या ताब्यात न आल्याने रस्त्याची कामे रखडली आहेत. विहितगाव चौफुलीवरून जुना चेहेडी रस्ता हा रिंगरोड मंजूर असून, तो अद्याप कागदावरच आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण रखडल्याने रहिवाशांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांचे काम मार्गी लागत नसल्याने पथदीपांचे कामदेखील रखडले आहे. यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरते. नाशिकरोडच्या पूर्व भागातील चेहेडी पंपिंग परिसराचा झपाट्याने होत असलेला विस्तार तसेच आरक्षित होत असलेला विस्तार लक्षात घेऊन आरक्षित रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन रस्ते बनविणे गरजेचे आहे. कॉलनी रस्त्याचे रुंदीकरण व रस्त्यांचे जाळे निर्माण केल्यास चेहेडी पंपिंगच्या विकासाला हातभार लागणार आहे.
चेहेडी पंपिंग परिसरात रस्ते अद्याप मातीचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:41 PM