चांदवड : शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची बातमी कळताच प्रशासन जागे झाले असून, गावासह शहराकडे येणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत.बुधवारी (दि. ८) नागरिकांनी बाजारात सोशल डिस्टसिंग न पाळल्याच्या कारणावरून पोलिसांनी भाजीपाला विक्री व किराणा दुकाने पूर्णपणे बंद करून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात शहरात कोरोनाचा रुग्ण मिळून आल्याने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.चांदवड शहरात येणारे सर्व मार्ग शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर सील करण्यात आली आहेत. दवाखाने व मेडिकल स्टोअर्सवगळता कोणतेही दुकाने सुरू राहणार नाही.तालुक्यातील अनेक गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरील व्यक्ती गावात येणार नाही किंवा गावातील कोणतीहीव्यक्ती बाहेर जाणार नाही, यासाठी तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, सरपंच आशासेविका, अंगणवाडी सेविका प्रयत्नशील आहेत.पाच किलोमीटरचा परिसर हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बफर झोनमधील गावांमध्येसुद्धा कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. घराघरी जाऊन आरोग्य विभागाचे सर्वेक्षण संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या वतीने सर्वच मुख्य रस्त्यांवर जंतुनाशक फवारणी सुरू आहे. घराघरी जाऊन आशा सेवक, आरोग्य सेविकांच्या पथकाने सर्वेक्षण करावे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे यांनी दिली.