चहा, वडेवाले दुकाने झाली बंद
नाशिक : ज्या दुकानांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होते अशा दुकानदारांवर फिजिकल डिस्टन्स नियमांच्या उल्लंघनप्रकरणी दंडात्मक कारवाई तसेच दुकान सील केले जात असल्याने शहरात अशोकस्तंभ, गंगापूर रोड, शरणपू रोड, कॉलेज रोड या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थांची दुकाने बंद होती. दुकानदारांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवल्याचे दिसून आले.
शहरातील बसेसच्या फेऱ्या कमी
नाशिक : शहरातील नागरिक बसने प्रवास करण्याचे टाळत असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील बसफेऱ्यांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. शहरात अवघ्या २८ ते ३० बस सुरू आहेत. त्यातीलही एकेक बस प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंद केली जात आहे.
दुकानांना आग लागण्याच्या घटना
नाशिक : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात दुकाने, कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. कोरोनाचे संकट असल्याने व्यवसायावरदेखील परिणाम होत असताना आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत आगीच्या लहान-मोठ्या अनेक घटना घडलेल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे आगी लागत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
दुकानांसमोर पुन्हा एकदा मार्किंग
नाशिक : शहरात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून त्यामुळे दुकानांसमोर पुन्हा एकदा मार्किंग दिसू लागले आहे. जिल्ह्यात निर्बंध लागू असतानाही दुकानांमध्ये गर्दी होत असल्याने पोलिसांनी कारवाई सुरू करताच दुकानदारांनी दुकानांसमेार डिस्टन्ससाठी चौकोन आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील दुकानांसमोर आता ग्राहकांची शिस्त दिसू लागली आहे.
चौकाचौकात दिसू लागले पोलीस
नाशिक : बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केलेला असल्याने आता शहरातील चौकांमध्ये पोलीस दिसू लागले आहेत. बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बॅरिकेड्स दिसू लागल्याने उगाच बाहेर फिरणाऱ्यांना आता पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे. मास्क नसणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईदेखील सुरू केली आहे.