एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद या रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.पूर्व भागातील एकलहरेगाव ते डर्क इंडिया कंपनी पर्यंतचा रस्ता, एकलहरे शिव रस्ता, एकलहरे ते दारणासांगवी शिव रस्ता, चाडेगाव ते कोटमगाव रस्ता, हिंगणवेढे ते ओढा जिल्हा प्रमुख मार्ग, लाखलगाव ते दहावा मैल (ओझर) व्हाया सिध्द पिंप्री हायवे या सर्वच रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. या रस्त्यांची डागडुजी न झाल्याने रस्त्यांवरचे डांबर उखडून खडी उघडी पडली आहे. लाखलगाव पासून दहाव्या मैलापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वारंवार अपघातांना सामोरे जावे लागते.या रस्त्यांवरुन दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे मुश्किल झाले आहे.एकलहरे-हिंखणवेढे दारणा सांगवी हा शिवरस्ता मळे विभागातून जातो.शेतकऱ्यांनी दोन्ही बाजुने अतिक्रमण करुन अरुंद करुन ठेवला आहे. दोन वाहने समोरासमोर आल्यास हमरी-तुमरी होते.हा रस्ता अतिक्रमण मुक्त करुन आमदार, खासदार निधितून अथवा जिल्हा नियोजन मंडळामार्फत दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी साहेबराव धात्रक, रतन धात्रक, गंगाधर धात्रक, वाल्मिक धात्रक, भास्कर कराड या शेतकऱ्यांनी वारंवार केली आहे. एकलहरे गावापासून डर्क इंडिया कंपनी पर्यंतच्या रस्त्याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यावर सी.एस.आर.अंतर्गत या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु झाले. यासाठी एकलहरेची आडवाटेपासून रस्ता वाहतूकिस बंद करण्यात आला, त्यामुळे वाहन धारकांना पर्यायी मळे विभागातील रस्त्याचा वापर करावा लागतो. या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांनी केली आहे.
पावसामुळे पूर्व भागातील रस्ते झाले निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 12:32 AM
नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद या रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
ठळक मुद्देएकलहरे : सार्वजनिक बांधकाम खात्यासह जिल्हा परिषदेचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष