----
पाहुण्याला मारहाण करत ३९ हजारांची लूट
नाशिक : शालिमार चौकातून पंचवटीच्या दिशेने पायी निघालेल्या घाटकोपर येथून आलेल्या पाहुण्या व्यक्तीची वाट अडवून दोघा अज्ञात लुटारुंनी मारहाण करत सुमारे ३९ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी फिर्यादी आनंद बळवंत सोरटे (४८,रा.भीमनगर, घाटकोपर), हे शुक्रवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास शालिमार चौकातून मार्गस्थ होत होते. यावेळी दोघा अज्ञात संशयितांनी शिवसेना कार्यालयाच्याजवळ त्यांना अडवून पाठीमागून मानेला धरत मारहाण केली. तसेच त्यांच्या हाताच्या बोटातील ३० हजारांची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ७ हजारांचा मोबाइल, २ हजारांची रोकड असा सुमारे ३९ हजारांचा ऐवज लुटून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोरटे हे पंचवटी येथील राहुलवाडी परिसरात पत्नीच्या माहेरी जात असताना ही घटना घडली.
---
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द ठार
नाशिक : जुने नाशिक परिसरातील रहिवासी असलेले नसरुद्दीन मोहम्मद शेख (७०) हे मुंबई-आग्रा महामार्गाच्या बाजूने पहाटे सहा वाजेच्या सुमारास पायी द्वारकेकडे येत असताना आडगावकडून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत शेख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेख यांचा धाकटा मुलगा अलाऊद्दीन शेख (२०,रा.जहागीरदारवाडा, द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शेख हे एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. रात्रपाळीची नोकरी आटोपून ते घरी परतत असताना पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात बळीमंदिराजवळ घडला. पहाटेची वेळ असल्यामुळे वाहनाचा प्रकार, क्रमांक कोणीही बघू शकले नाही. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळी थांबून जखमी शेख यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याऐवजी घटनास्थळाहून वाहनासह पळ काढला. दुर्दैवाने या अपघातात शेख यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून असा परिवार आहे. त्यांच्या मृत्युने जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.