-----
द्वारकेवरील दुकान फोडून ७५ हजाराचा ऐवज लुटला
नाशिक : द्वारका येथील दुकान फोडून चोरट्याने ७५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना १६ ते १७ जानेवारीदरम्यान घडली. याप्रकरणी पंकज मनोहर साबणे (३८, रा. द्वारका) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपयाची रोकड लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
---
भद्रकालीत किराणा दुकान फोडले
नाशिक : भद्रकाली परिसरातील रेणुका नावाचे किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्याने २० हजार १०० रुपयाची रोकड लंपास केली. याप्रकरणी एस. ए. माळवदकर (३४, रा. अमृतधाम) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लंपास केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
---
मारहाणप्रकरणी तीन वर्षांची सक्तमजुरी
नाशिक : युवकाला विनाकारण मारहाण करत गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. शाह यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व ५,५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. विशाल गगनसिंग रावत (रा. तपोवन) असे या आरोपीचे नाव आहे. विशाल याने ६ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी पंचवटी अमरधाम येथे दुर्योधन रामचंद्र कोंगे (रा. टाकळी) यास विनाकारण मारहाण करत जखमी केले होते. फायटरने हल्ला चढविल्याने दुर्योधनच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले होते. यानंतर दुर्योधनच्या खिशातील १० हजार रुपयेदेखील गहाळ झाले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विशालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. सरोदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे जे. बी. कारंडे यांनी युक्तिवाद केला. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने विशालला तीन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली.