राजस्थानातील संतोषकुमार अर्जुनलाल मीना हे गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हवाई दलाची परीक्षा देण्यासाठी नाशिकला दाखल झाले. शुक्रवारी परीक्षा दिल्यानंतर राजस्थानकडे परतण्यासाठी ते रात्री साडेनऊ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकाजवळ आले. परंतु त्यांच्याकडे खात्रीपूर्वक आरक्षण तिकीट नसल्याने मुक्कामासाठी ते लॉजचा शोध घेत होते. दरम्यान, येथील एका हॉटेलजवळ मीना यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गाठले. ‘आम्ही तुम्हाला स्वस्तात लॉज देतो’ असे सांगून त्यांना दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. यावेळी संशयितांचा एक साथीदारदेखील तेथे आला. या तिघांनी मिळून मीना यांना दुचाकीने विहितगाव येथील विठ्ठल मंदिराजवळ नेले. तेथे तिघांनी संतोषकुमारला कोयता व चाकूचा धाक दाखविला. त्यांच्या खिशातील दोन हजार दोनशे रुपये व मोबाइल काढून घेतला आणि ‘पोलिसांकडे गेलास तर याद राख..’ असा दम भरत मीना यांना पुन्हा दुचाकीवर (क्र. एमएच १५ सीई ४५१९) बसवून रात्री साडेदहा वाजता रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी लुटारू निघाले. यावेळी मीना यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संशयित नदीम सलीम बेग (२२), दीपक अशोक पताडे (१९) आणि एक सोळा वर्षीय अल्वपयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताकडून दुचाकी, कोयत्यासह संतोषकुमारचा मोबाइल, रोकड जप्त केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघा लुटारूंविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नदीमविरुध्द यापूर्वीही मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
---इन्फो---
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
संशयित लुटारू मीना यांना दुचाकीवर मध्यभागी बसवून रेल्वे स्थानकाकडे येत होते. यावेळी अमरधामजवळील वालदेवी पुलावर दुचाकी आली असता मीना यांनी पाठीमागे वळून बघितले असता त्यांना पोलीस गस्ती पथकाचे वाहन येताना दिसले. यावेळी मीना यांनी क्लृप्ती लढवून लुटारूंना पाठीमागून ठोशा मारत झटापट केली अन् दुचाकी चालविणाऱ्याचा ताबा सुटला आणि चौघे कोसळले. यावेळी पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वेगाने दुचाकीजवळ येत गाडी थांबविली. यावेळी मीना यांनी सगळा प्रकार कथन करताच मूळ कागदपत्रे दाखविली असता पोलिसांनी तिघा संशयित लुटारूंना वाहनात डांबले.