नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे चार महिन्यांपूर्वी स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम केंद्र फोडून सुमारे आठ लाखांची रोकड चोरून नेणाऱ्या शिवाजीनगरजवळील पंचशीलनगर- मधील सहा जणांच्या टोळीला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर येथे एकाच गाळ्यातील दोन भागांमध्ये स्टेट बॅँक आॅफ इंडिया व युनियन बॅँकेचे स्वतंत्र एटीएम केंद्र आहे. चार महिन्यांपूर्वी ३ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे कामगार एटीएम मशीनमध्ये रोकड भरण्यास आले. एटीएममध्ये रोकड दाखल केल्यानंतर पैशांचा हिशोब लागत नसल्याने कामगारांनी एटीएमची पाहणी केली असता स्टेट बॅँकेच्या एटीएम मशिनच्या पाठीमागील पत्रा कापून रोकड चोरून नेल्याचे लक्षात आले, तर युनियन बॅँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे लक्षात आले. याबाबत मिलिंद काशीनाथ नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ७ लाख ९० हजार ५०० रुपये दरोडा टाकून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.दोन्ही एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद व काही कमकुवत असल्याने पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, देवराज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी. एफ. इंगळे, जी. आर. जाधव, एम. व्ही. शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक साळवे, बाळू मांदळे, के. टी. गोडसे, बाळानाथ बोडके, किरण देशमुख, रोहित भावले, महेंद्र जाधव, सुधीर काकड आदि या गुन्ह्यांचा सर्वतोपरी तपास करीत होते. दोन दिवसांपूर्वीच उपनगर गुन्हे शोध पथकाला एटीएम केंद्रातील चोरीबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नीलेश उर्फ दाद्या अलेक्स किन (२५), राजेश उर्फ चिकु सुरेश खडताळे (२४) (दोघे रा. पंचशील कॉलनी, दादासाहेब गायकवाडनगर, शिवाजीनगर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. दोघांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने एटीएम केंद्रात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी अभिजित ऊर्फ नाना उत्तम सुपारे (२५ रा. निर्मिती अॅव्हेन्यु, रॉयल कॉलनी वडाळारोड,) मनोज अनिल विखे (१९), दिनेश हरी यशवंते (दोघे रा. पंचशील कॉलनी, शिवाजीनगर) व अजय संजय पवार (मूळ रा. गोसावीवाडी सध्या रा. गोवंडी मुंबई) या चार जणांना ताब्यात घेतले. सहाही जणांनी एटीएम केंद्रात दरोडा टाकून सुमारे आठ लाखांची रोकड चोरल्याची कबुली दिल्याचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चोरीसाठी वापरलेले कटर मशीन, ग्रार्इंडर, इलेक्ट्रिक वायर पोलिसांनी जप्त केली असून, रोकड हस्तगत होऊ शकली नाही. सहाही संशयितांना नाशिकरोड न्यायालया समोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पोलिसांचे कौशल्य अन्् गुन्ह्यांची उकलगेल्या चार महिन्यांपासून उपनगर पोलीस एटीएम केंद्रातील चोरी प्रकरणी सर्वतोपरी शोध घेत होते. पंचशील नगरमधील काही युवकांनी गेल्या काही महिन्यांत टीव्ही, फ्रिज खरेदी केले आहेत, तर काहींनी महागडे मोबाइल खरेदी करून घराचे थकलेले भाडे, घरपट्टी भरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दरोडा घालणाऱ्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळविली. यामधील प्रमुख नीलेश किन हा असून, दिनेश यशवंते हा इलेक्ट्रीशियनचे काम करतो. १ सप्टेंबरपासून सलग दोन दिवस संशयित एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न करीत होते. पहिल्या दिवशी कटर मशीनचे ब्लेड तुटले. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आठ ब्लेड आणून त्याद्वारे एटीएम मशीनचा पाठीमागील पत्रा कापून चोरी केली. विशेष म्हणजे एटीएम केंद्रातून वीज कनेक्शन घेऊन कटर व ग्रार्इंडर मशीन चालत नसल्याने त्यांनी इमारतीबाहेरील डीपीमधून कनेक्शन घेऊन आपले काम २ सप्टेंबरला रात्री फत्ते केले. चोरी करताना त्यातील काहीजण बाहेर लक्ष ठेवून होते. पैसे चोरल्यानंतर त्यांनी गांधीनगरच्या ओसाड पडलेल्या इमारतीत पैशांची वाटणी केली.
बँकेचे एटीएम फोडणारी टोळी जेरबंद
By admin | Published: December 30, 2016 12:19 AM