केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केले आहे; मात्र टोल नाक्यांवरील सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्राप्त झाल्या आहेत. आधीच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांना या लुटमारीमुळे दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शासनाचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. पिंपळगाव टोलनाक्यावर ‘वाहन’ या शासनाच्या अधिकृत सॉफ्टवेअर ऐवजी काही लेनमध्ये स्कायलार्क कंपनीचे वेगळे सॉफ्टवेअर वापरून शासनाचा महसूल बुडविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे निवेदनात म्हटले आहे. अजूनही काही सॉफ्टवेअर इतर टोलनाक्यांवर वापरात असू शकतात. जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यांवर तसेच राज्यातील इतरही टोलनाक्यांवर वापरात असलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीची सखोल चौकशी करून शासनाचे होत असलेले आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी मनसेने केली आहे.
निवेदनावर प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, शैलेश येलमामे, रवींद्र विसपुते, नामदेव पाटील, तालुकाध्यक्ष शैलेश शेलार, सुनील गायधनी, विलास सांगळे, मनविसे प्र. उपाध्यक्ष संदीप भवर, शहर संघटक अमित गांगुर्डे, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, वाहतूक जिल्हाध्यक्ष जावेद शेख, रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित गोसावी, सौरभ सोनवणे, निफाड तालुका उपाध्यक्ष केशव वाघ, मनविसे निफाड तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, मनविसे निफाड विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे यांच्या सह्या आहेत.