इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कैलासनगर परिसरात भरदिवसा घरफोडी आणि घरात शिरून बालकाच्या गळ्याला चाकू लावून आईच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लुटणारा संशयित आरोपी तडीपार गुन्हेगार करण कडुसकर याला अटक करण्यात येऊन त्याच्याकडून ४३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाम स्क्वेअर बिल्डिंग, कैलासनगर याठिकाणी दोन दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी या बिल्डिंगमधील दोन बंद घरांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून त्यातील एका घरातून सोन्याचे व चांदीचे एकूण १५ हजारांचे दागिने लंपास केले होते. तसेच त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तींनी बिल्डिंगच्या वाहनतळामधील खोलीत राहत असलेल्या वॉचमनच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून वॉचमनच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून तिच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, रोख दहा हजार रुपये, एक मोबाईल असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटून घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींवरून पळ काढला होता.
फिर्यादीला यादीवरील गुन्हेगारांचा छायाचित्राचा अल्बम दाखवला असता, अंबड पोलीस ठाण्यातील यादीवरील तडीपार गुन्हेगार ऋषिकेश कांबळे (१९, घरकुल योजना, चुंचाळे) याला ओळखले. हा संशयित आरोपी घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानाचे शटर तोडून पळून जात असताना घोटी पोलिसांनी पकडून त्याला अटक केली होती. दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता, हद्दपार गुन्हेगार करण कडुसकर (२०, रा. अंबड) याच्यासह इतर दोन साथीदारांची खोटी नावे सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनिरीक्षक जाकीर शेख, शरद आहेर, प्रभाकर पवार, दत्तात्रय गवारे आदींनी सापळा रचून तडीपार गुन्हेगार करण कडुसकर याला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी, हत्यार, घड्याळ, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कपडे असा एकूण ४३ हजार पन्नास रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.