गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक रूग्णवाहिका चालकांनी माणुसकीचा धर्म म्हणून आपली सेवा मोफत उपलब्ध करून दिली होती. मात्र यंदा आता त्याची जागा धंद्याने घेतली असून, शासकीय व खासगी रूग्णालयांच्या बाहेर या रूग्णवाहिका उभ्या करून सावज हेरले जात आहे. रूग्ण व त्याच्या नातेवाईकांची असहाय्यता लक्षात घेऊन मनात येईल त्या दराने रूग्णवाहिका भाडे आकारत आहेत.
----------
अशी आहे रूग्णवाहिकेची आकडेवारी
११२ ऑक्सिजन असलेल्या
११२ शासकीय रूग्णवाहिका
-----
१३२ ऑक्सिजन असलेल्या
२२३ खासगी रूग्णवाहिका
----------------
बिटको रूग्णालय
नाशिक रोडच्या बिटको रूग्णालयापासून मुंबई नाका येथे रूग्णाची ने-आण करण्यासाठी खासगी रूग्णवाहिका चालकाकडून तीन हजार रूपयांची भाडे आकारणी करण्यात आली. मुळात हे अंतर दहा किलोमीटरचे असून, प्रती किलोमीटर तीनशे रूपये या दराने ही आकारणी करण्यात आली.
-----
त्रिमूर्ती चौक
सिडकोतील त्रिमूर्ती चौकातून एका रूग्णाला त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात पोहोचविण्यासाठी रूग्णवाहिका चालकाने अडीच हजार रूपयांची आकारणी केली. या दोन्ही ठिकाणाचे अंतर अवघे साडेचार किलोमीटर इतके आहे.
------------
गंगापूर रोड
गंगापूर रोडवर अनेक खासगी रूग्णालये असून, यातील बहुतांशी रूग्णालये अगदीच जवळजवळ आहेत. तरी देखील रूग्णवाहिकांची भाडे आकारणी कमी झालेली नाही. काही खासगी रूग्णालयांची स्वत:ची रूग्णवाहिका असून, त्यांनी देखील दराबाबत निश्चिती केलेली नाही.
--------------
तक्रार कुठे करायची ?
१ रूग्णवाहिकांच्या मनमानी दर आकारणीबाबत गेल्या वर्षी प्रशासनाने आरटीओ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती गठित केली.
२ या समितीने किलोमीटर प्रमाणे रूग्णवाहिकांनी किती दर आकारणी करावी याबाबत दर आकारणी ठरवून दिली होती.
३ रूग्णवाहिका चालकांकडून मनमानीपणे दर आकारणी केली जात असेल तर त्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रारीची सोय करण्यात आली आहे.
-----------