सातपूर : अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मदतीची गरज लागणार नाही असा स्वदेशी बनावटीचा ‘रोबोट’ तयार करण्यात आला असून, या रोबोटचे (रोबोट रायटर वर्कशॉप) प्रात्यक्षिक नॅब कार्यशाळेत घेण्यात आले. या नावीन्यपूर्ण रोबोटचे उपस्थितांनी कौतुक केले.नॅब आणि रायझिंग इनोव्हेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर येथील कार्यशाळेत ‘रोबोट रायटर वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले होते. धनेश बोरा, वैभव जाधव, जिनय गडा, प्रवीण गाडे या मराठी तरुणांनी अंध विद्यार्थ्यांसाठी रोबोट तयार केला आहे. या रोबोटमुळे अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अन्य कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही. रोबोट वापरून ते परीक्षा देऊ शकतील. त्यामुळे पेपरलेस परीक्षा होऊ शकते तसेच विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण शून्य टक्क्यावर येईल. या रोबोटच्या माध्यमातून १०८ भाषेत पेपर देता येईल. शिवाय या डिव्हाईसमुळे अभ्यासदेखील करता येईल. या रोबोटमुळे अंध व हात नसलेले तसेच दिव्यांगांनाही मदत होणार आहे. जवळपास तीस लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. हा रोबोट मोबाइलपेक्षा लहान आणि स्वस्त आहे.रोबोट खिशात घेऊनदेखील फिरता येऊ शकतो, अशी माहिती धनेश बोरा यांनी कार्यशाळेत दिली. यावेळी उपस्थितांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. याप्रसंगी नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सूर्यभान साळुंखे, प्राचार्य बाळासाहेब लोंढे, प्रा. कैलास शिवदे, वैभव पुराणिक, वेदांत मुंदडा आदींसह अंध विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूर्वी या डिव्हाईसमध्ये अमेरिकेचे सॉफ्टवेअर वापरले जात होते. त्यामुळे त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. आता स्वदेशी बनावटीचा रोबोट तयार केला असून, त्याची किंमत अवघी २० हजार रुपये आहे. साडेतीन इंचापासून ते ५० इंचापर्यंत हा मायक्रो कॉम्प्युटर आहे. शासनाने अनुदान दिले पाहिजे.- धनेश बोरा, संचालक, रायझिंग इनोव्हेटर्स
अंध विद्यार्थ्यांसाठी रोबोटची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:14 AM