सुरगाणा : दिवस रात्र संततधार पावसामुळे आधीच निकृष्ट असलेल्या हरणटेकडी रस्त्यावर हजारो खड्डे पडून रस्त्याची पार वाट लागली आहे. सुरगाण्याहून वणी, नाशिककडे किंवा तिकडून सुरगाण्याकडे येण्यासाठी हरणटेकडी हा मधून असलेला जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दिवस रात्र सुरू असते. मधला मार्ग असल्याने गुजरातकडे भाजीपाला, दूध व अन्य चीजवस्तूंची अवजड वाहने देखील ये जा करतात. या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने व वाहतूक जास्त असल्याने हा रस्ता लवकरच खराब झाला होता. बऱ्याच उशिराने मलमपट्टी करण्यात आली. मात्र ती फार काळ टिकली नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाला आण िरस्त्यावरील लहान खड्डे मोठे झाले. व मोठे खड्डे आणखीनच मोठे झाले. त्यामुळे ठिकठिकाणी खड्यांची संख्या वाढत हजारोत झाली आहे. या मार्गावर रात्रीचे वेळी काही वेळा दाट धुके रहात असल्यामुळे दूचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनचालकांना वाहन चालविणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. खरे तर दळणवळणासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने असंख्य वाहनांची वर्दळ असते. त्यासाठी हा मार्ग पुर्ण खोदून नव्याने बनविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या मार्गाचे रूपांतर महामार्गात होईल तेंव्हा होईल. पण सद्यस्थितीत संबंधित खात्याने या हरणटेकडी रस्त्याकडे लक्ष घालून सर्व खड्डे बुजवून वाहतूकीसाठी हा मार्ग सुकर करावा अशी मागणी वाहनधारक, प्रवासी व या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
हरणटेकडी रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:33 PM