नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राचीन ठेवा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे, असे प्रतिपादन शिक्षण अभ्यासक महेश दाबक यांनी केले.
‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर त्यांनी डिजिटल वसंत व्याख्यानमालेचे बाविसावे पुष्प गुंफले. स्व. डॉ. सुभाष सुराणा यांच्या स्मृतीव्याख्यानात बोलताना त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचाही वेध घेतला. ब्रिटिश राजवटीत मेकॉले शिक्षणपद्धत होती. स्वातंत्र्यानंतरही हीच शिक्षणपद्धती सुरू राहिली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे मेकॉलेचे भूत गाडले जाणार आहे. २०२० च्या शैक्षणिक धोरण समितीत फक्त शिक्षणतज्ज्ञांचा समावेश होता. ४८४ पानांच्या या धोरणात पुस्तकाच्या बाहेरही शिक्षण आहे, याची जाणीव करून दिल्याचे दाबक यांनी सांगितले.
शाळा आणि कॉलेजशिवायही शिक्षण घेता येईल, तसेच विद्यार्थ्यांना स्वतःचे शिकण्याचे मार्गही नव्या धोरणात आहेत. अभ्यासक्रम निवडण्याची मुभा या धोरणात असल्याने शिक्षण खऱ्या अर्थांनी खुले होणार आहे, असेही दाबक यांनी नमूद केले. यापूर्वी अभ्यासक्रम, मार्क्स, परीक्षा यामध्ये स्पर्धा होती, नवे धोरण सहचार्याचे आहे, ही आनंददायी बाब असून कल्पनाशक्ती, सर्जनशीलता नावीन्यपूर्ण, कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. लवचिकता असल्याने हे शैक्षणिक धोरण ज्ञान परंपरेचा ठेवा ठरणार असल्याचे महेश दाबक म्हणतात.
नव्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिक्षण व्यवस्थेचा अंगीकार करण्यात आला आहे. त्यात विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, संख्याज्ञान, पायाभूत सुविधा यांचा समावेश असल्याने आनंददायी शिक्षण राहणार आहे. म्हणजेच पदवीनंतरही पीएच.डी. विद्यार्थ्यांना करता येईल. शिवाय विदेशी विद्यापीठाचे कॅम्पस आयोजित करण्यास परवानगी दिली गेली. अशा परिस्थितीत शिक्षकांनी मानसिकता बदलण्याची गरज महेश दाबक यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण हवे असेल तर शिक्षकाची भूमिका एक मार्गदर्शक म्हणून राहील आणि शिक्षणाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी त्यातील ‘ट्रॅफिक जॅम’ काढून ‘फ्लाय ओव्हर’ उभारण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे, असेही महेश दाबक यांनी स्पष्ट केले. यावेळी तुषार चांदवडकर यांनी स्व. डॉ. सुभाष सुराणा यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. याप्रसंगी सम्यक सुराणा, रश्मी सुराणा उपस्थित होते.
प्रास्ताविक व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार चिटणीस संगीता बाफना यांनी केला.
आजचे व्याख्यान
वक्ते : सुजाता बाबर
विषय : खगोलशास्त्र व दैनंदिन जीवन