सिन्नर: येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी उजळणी प्रशिक्षण वर्गाचे दुसऱ्या दिवसाचे सत्र संपन्न झाले. यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मविप्र एचआरडीसी संचालक डॉ. ए. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी व्याख्यानातून आधुनिक काळातील शिक्षणाची भूमिका विशद केली. शिक्षकांनी अपडेट असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अवांतर वाचन अध्यापनात उपयुक्त ठरते, त्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता आला पाहिजे, असे स्पष्ट केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी मनोगतात शिक्षण व शिक्षण प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणच तरुणांचा सर्वांगीण विकास घडवून आणेल, असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आर. वाय. संत यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे, असा संदेश दिला.
दुसऱ्या सत्रात डॉ. एस.बी. अहिरे यांनी ''रोल ऑफ लायब्ररी ॲण्ड लायब्ररियन इन टिचींग लर्निंग ॲण्ड रिसर्च ऍक्टिव्हिटी'' या विषयावर मार्गदर्शन केले. आधुनिक काळातील ई लर्निंग, ई बुक आदीविषयी सविस्तर चर्चा केली. ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा असल्याने ग्रंथांचा व ग्रंथालयाचा वापर करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. जी. पी. चिने यांनी ग्रंथालयाची आवश्यकता स्पष्ट केली. अतिथींची ओळख प्रा.डी.जे. पगार यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. झेड. ठाकरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सी. जे. बर्वे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर. टी. गुरुळे तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. एस बी पाटोळे यांनी मानले.