नाशिक : सीए अभ्यासक्रमातील मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटर तथा आॅल इंडिया इंटरग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पेटेन्स कोर्स (आयपीसीसी) परीक्षेत नाशिक केंद्रातील रोनक जैन याने राज्यात पहिला तर, देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. रोनक याने या परीक्षेत दोन्ही ग्रुपमध्ये ७०० पैकी ५६१ म्हणजेच ८०.१४ टक्के गुण मिळवले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या नागद येथील रोनकने शिक्षणासाठी औरंगाबाद-जळगाव-नाशिक असा प्रवास केला आहे. आपल्या मूळगावी नागद येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतून दुसरीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने सातवीपर्यंत खासगी शाळेतून शिक्षण घेतले. मुलाची शिक्षणाची ऊर्मी पाहून आणि गुणवत्तेने भारावून वडील राजेंद्र जैन यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी जळगावला पाठवले. तेथे रोनक याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी नाशिकला आला. त्याने येथेच अकरावी आणि बारावी उत्तीर्ण होऊन जून २०१६ मध्ये सीएसीपीटी परीक्षा दिली. या परीक्षेत त्याने २०० पैकी १८८ गुण मिळवले होते. तर मे २०१७ मध्ये झालेल्या आयपीसीसी परीक्षेत ७०० पैकी ५६१ गुण मिळवून देशात दुसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे. नाशिक केंद्रातून एकूण २५ विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले असून, यात रोनकने प्रथम तर सेजल सुराणा व सुशांत पवार यांनी ४५७ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. नाशिक केंद्रातील एकूण १२३ विद्यार्थ्यांनी ग्रुप एक उत्तीर्ण केला आहे. तर ७६ विद्यार्थ्यांनी ग्रुप दोन उत्तीर्ण केला आहे. गेल्या वर्षी या परीक्षेत नाशिकच्या कुशल लोढा याने देशात दहावा येण्याचा बहुमान मिळवला होता. त्यामुळे नाशिकचा शैक्षणिक क्षेत्रातील आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे यातून दिसून येत आहे.
रोनक जैन सीए इंटरमध्ये राज्यात पहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:07 AM