नाशिक : एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असताना दुसरीकडे 'रेमडेसिविर'चा काळाबाजार करताना चक्क एका डॉक्टरला पोलिसांनी रंगेहाथ रविवारी रात्री अटक केली होती. त्यास सोमवारी (दि.१२) जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत असताना अमृतधाम भागात एक खासगी डॉक्टरच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका गरजू ग्राहकाला संशयित डॉ. रवींद्र श्रीधर मुळक (४०) हा इंजेक्शन सुमारे २५ हजार रुपयांत विक्री करणार होता. दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षामध्ये १०० क्रमांकावर याबाबत तक्रार प्राप्त होताच
पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अमृतधाम भागातून संशयित डॉक्टर मुळकला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुळक याने तीन रेमडेसिविर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत २५ हजार रुपये असल्याचेही सांगितले. त्यानुसार, तक्रारदाराने खरेदीची तयारी दर्शविली. एका कारमध्ये मुळक हे रेमडेसिविर इंजेक्शनच्या तीन बाटल्या (वायल्स) घेऊन ग्राहकाची येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या कारची झडती घेऊन इंजेक्शनच्या तीन बाटल्या जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉ. मुळक हा पंचवटीमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असून, त्याचे म्हसरूळमध्ये स्त्रीरोग क्लिनिकसुद्धा आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तूविक्री, अन्न-औषधविक्री कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.