नाशिक : पखालरोडवरील ‘स्टार ॲक्वेरियम’मध्ये गेल्या आठवड्यात नाशिक पश्चिम वनविभागाने रात्रीच्या सुमारास धाड टाकली होती. यावेळी या मत्स्यालयामधून प्रतिबंधित ४० वन्यजीव आढळून आले होते. याप्रकरणी दोघा भावांना वनविभागाने अटक केली होती. गुरुवारी (दि. १०) पुन्हा वनविभागाने संशयिताना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने वसीम चिरागोद्दीन शेख याच्या वनकोठडीत दोन दिवसांची वाढ केली तसेच संशयित फारूख चिरागोद्दीन शेख याला येत्या गुरुवारपर्यंत (दि. १७) न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (दि. १०) वनकोठडी दिली होती.
पखालरोडवरील वृंदावन कॉलनीच्या कॉर्नरवर असलेल्या या मत्सालयामध्ये अनुसूची-१मधील काही प्रतिबंधित वन्यजीव असल्याची गोपनीय माहिती नाशिक पश्चिम वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक वनसंरक्षक अनिल पवार, फिरते दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेंद्रकुमार पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ४) धाड टाकली होती. यावेळी दुकानाची वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी झडती घेतली असता वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसूची-१ व ४ मध्ये समाविष्ट असलेले विविध वन्यजीव मोठ्या संख्येने आढळून आले होते. यामुळे संशयित शेख बंधूंना वनविभागाने अटक केली. या दोघांवर वन्यजीव विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी नाशिक वनपरिक्षेत्रांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासाला वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी गती दिली. त्यांच्याकडून पोपटांची विक्रीकरिता खरेदी करणाऱ्या सिडकोमधील विक्रेता संशयित भरत बाळू देवरे यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन जंगली पोपट हस्तगत करण्यात आले. त्यास न्यायालयाने आठवडाभराची वनकोठडी दिली आहे.