लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून गणल्या गेलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता यंदा आघाडीत जागावाटप करताना रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॉँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केलेली असताना राष्टÑवादीदेखील ही आपलीच जागा असे समजून कामाला लागली आहे.
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत आघाडीकडून एकत्रित निवडणूक लढविली जाणार असून, काही जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचे सूतोवाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी केले होते. आघाडीच्या जागावाटपाच्या फार्म्युलाचा विचार करता २००९ प्रमाणे जागावाटप झाल्यास चांदवड मतदारसंघ राष्टÑवादीच्या वाट्याला दिला जाईल, असे सांगितले जाते, परंतु कॉँग्रेसला ते मान्य नाही. यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस या मतदारसंघावर दावा सांगत आहे. तर राष्टÑवादीने आपला दावा भक्कम करताना २००४ च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला आहे. २००४ मध्ये राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानंतर या मतदारसंघावर राष्टÑवादीचे वर्चस्व होते. परंतु २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला व कॉँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. जवळपास ५७ हजारांच्या मताधिक्क्याने कॉँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराने ही जागा राष्टÑवादीकडून खेचून घेतली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने हा मतदारसंघ ताब्यात घेतला असला तरी, कॉँग्रेस उमेदवाराने दुसºया क्रमांकाची मते घेतली व अपक्ष उमेदवार तिस-या क्रमांकावर फेकला गेला. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे चौथ्या क्रमांकाची मते घेतलेली असताना राष्टÑवादीला यंदा कशाच्या बळावर जागा सोडणार असा प्रश्न कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात चांदवड विधानसभा मतदारसंघ सोडण्यावरून रस्सीखेच सुरू झाली असून, दोन्ही कॉँग्रेसच्या इच्छुकांनी मात्र निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे.