चांदवडच्या जागेवरून आघाडीत रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:39 AM2019-09-26T01:39:26+5:302019-09-26T01:40:50+5:30
एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणल्या गेलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता यंदा आघाडीत जागावाटप करताना रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक : एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणल्या गेलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता यंदा आघाडीत जागावाटप करताना रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॉँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केलेली असताना राष्टवादीदेखील ही आपलीच जागा असे समजून कामाला लागली आहे.
आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाचा विचार करता २००९ प्रमाणे जागावाटप झाल्यास चांदवड मतदारसंघ राष्टÑवादीच्या वाट्याला दिला जाईल, असे सांगितले जाते, परंतु कॉँग्रेसला ते मान्य नाही. यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस या मतदारसंघावर दावा सांगत आहे. तर राष्टवादीने आपला दावा भक्कम करताना २००४च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला आहे. २००४ मध्ये राष्टवादी कॉँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानंतर या मतदारसंघावर राष्टÑवादीचे वर्चस्व होते. परंतु २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला व काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ ताब्यात घेतला असला तरी, कॉँग्रेस उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे राष्टÑवादीला यंदा कशाच्या बळावर जागा सोडणार, असा प्रश्न कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.