सटाणा : यंदापासून सर्वत्र थेट सरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. बागलाण तालुक्यातही येत्या शनिवारी (दि. ७) सरपंचपदाच्या तब्बल ३६ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रथमच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांनी उडी घेतली असून, त्यांच्यासमोर तरुणाईने आव्हान उभे केले आहे. बहुतांशी गावांमध्ये भाऊबंदकीतच रामायण सुरू झाले आहे, तर काही ठिकाणी अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक उभे ठाकल्याने निवडणुकीच्या अंतिम चरणात या अस्तित्वाच्या लढाईमुळे चुरस निर्माण होऊन गावगाड्याचे राजकारण आॅक्टोबरच्या चटक्यामध्ये अधिकच धगधगत असल्याचे चित्र बागलाणमध्ये बघायला मिळत आहे.येत्या शनिवारी होत असलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक होत आहे. यापैकी तब्बल १९ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार म्हणजे कारभारीण घराऐवजी आता गाव सांभाळणार आहे, तर उर्वरित गावात कारभारीच कारभार पाहणार आहेत. बागलाणमध्ये विविध ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. गावगाड्यात सुरू असलेल्या या वर्चस्वाच्या लढाईत सर्वच उमेदवार साम, दाम, दंड, भेद या सर्वच अस्त्रांचा वापर करत असल्यामुळे साहजिकच थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मिनी ‘झेडपी’ची अनुभूती येत आहे. बहुतांश ठिकाणी लोकसभा, विधानसभा ते झेडपी, पंचायत समितीच्या राजकारणात सक्रिय राहून गावगाड्याचे राजकारण करणारे पुढारीदेखील रिंगणात आहेत. त्यांनी निवडणुकीत दाखविलेल्या निष्ठेचादेखील कस लागणार आहे. त्यामुळे खासदार-आमदार, झेडपी सदस्य हे केलेल्या कामाची परतफेड करतात, की ‘अब तेरी बारी’ म्हणून उट्टे काढतात या घडामोडीदेखील तालुका पातळीवर बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत असून, विरोधकांनी ऐन निवडणुकीत कात्रजचा घाट दाखविल्यामुळे ‘हम हम है’ ची भाषा करणाºयांची अक्षरश: भंबेरी उडाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अशा लक्षवेधी लढती बघायला मिळत आहेत.माजी सरपंच शांताराम बंडू अहिरे, माजी सभापती अनिल रामदास अहिरे, माजी उपसरपंच विश्वास पंडितराव मोरे, डॉ. कांतिलाल वेडू देवरे, संदीप चिंतामण ब्राह्मणकर, कडू राणू अहिरे, मच्ंिछद्र केदा खैरनार, योगेश रामदास खैरनार, उत्तम लक्ष्मण जाधव, वीजेंद्र सुभाष बच्छाव, पोपट भावराव मोरे, अशोक तुकाराम सोनवणे हे रिंगणात असून, बहुतांश उमेदवार जातीय समीकरण आणि भाऊबंदकीच्या जोरावर रणांगणात उतरले आहेत. या गावावर माळी आणि वाणी समाजानेच राज्य केल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्याला दलित आघाडीचे पंडित अंबर मोरे यांच्या कुटुंबाचा अपवाद वगळता समाजाच्या एकगठ्ठा मतांवर दोन्ही समाजाच्या हातातच गावाची सत्ता राहिली आहे.या निवडणुकीत माजी सरपंच शांताराम अहिरे, माजी आमदार संजय चव्हाण समर्थक अनिल अहिरे या माळी समाजाच्या उमेदवारांबरोबर वाणी समाजाचे संदीप ब्राह्मणकर या तुल्यबळ उमेदवारांना मराठा समाजाचे बोटावर मोजण्याइतके मतदान असताना, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क असलेले मराठा समाजाचे डॉ. कांतिलाल देवरे, दलित आघाडीचे नेते पंडित अंबर मोरे यांचे सुपुत्र विश्वास मोरे यांनीदेखील जनसंपर्क आणि अल्पसंख्याक गोळा करून आव्हान दिले आहे. एकंदरीत जायखेडा येथील निवडणुकीत वतन राखण्यासाठी माळी आणि वाणी समाजाला यश येते, की जनसंपर्काच्या जोरावर दलित मराठा वतनदारी मोडीत काढतात हे निकालाच्या दिवशीच कळेल.
सरपंचपदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:37 PM