सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी गुरुवारी (दि. १५) १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात नाशिक पूर्व प्रभाग सभापतिपदासाठी डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निश्चित झाली आहे. अशाच प्रकारे संख्याबळाच्या आधारे सिडकोतही सुवर्णा मटालेदेखील संख्याबळाच्या आधारे बाजी मारणार असल्याचे दिसते आहे. पश्चिम प्रभागात भाजपने मनसेच्या मदतीने महाविकास आघाडीला आव्हान दिल आहे.
महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींची मुदत तशी मार्च महिन्यात संपुष्टात आली असली तरी कोरोनामुळे विलंबाने निवडणुका होत आहेत. येत्या साेमवारी (दि.१९) होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपचे बहुमत असलेल्या पंचवटीत मच्छिंद्र सानप, रूची कुंभारकर आणि पूनम सोनवणे या तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. नाशिकरोड प्रभागासाठी शिवसेनेकडून प्रशांत दिवे, तर भाजपकडून मीरा हांडगे आणि सुमन सातभाई यांनी अर्ज दाखल केला आहे. या प्रभागासाठी भाजप आणि शिवसेनेकडे समसमान संख्याबळ आहे.
इन्फो...
मनसे-भाजपचे साटेलोटे
नाशिक पश्चिम प्रभागात मनसेच्या मदतीने महाविकास आघाडी बाजी मारत असताना मनसेच्या मदतीने आता भाजपनेच महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. या प्रभागात काँग्रेसच्या वत्सला खैरे तसेच भाजपच्या योगेश हिरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने मनसेच्या ॲड. वैशाली भोसले यांचे मत निर्णायक ठरणार आहे तर सातपूरमध्ये भाजप, मनसेची पुन्हा युतीच दिसत असून, याठिकाणी मनसेच्या योगेश शेवरे यांना भाजपची साथ आहे. शिवसेनेकडून मधुकर जाधव यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या वतीने मधुकर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.