नाशिक : सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारी संस्था म्हणून रोटरी क्लब ओळखले जाते. २०१६-२०१७ वर्षासाठी ‘मानवतेची सेवा’ ही संकल्पना जागतिक स्तरावर घोषित करण्यात आली आहे. या संकल्पनेनुसार शहरासह जिल्ह्यात भरीव कामगिरी करणार असल्याचा संकल्प निवडण्यात नाशिक रोटरीच्या सभासदांनी सोडला.निमित्त होते, रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या पदग्रहण सोहळ्याचे. गंजमाळ येथील रोटरी सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळ्यामध्ये २०१६-१७ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष विवेक जायखेडकर यांच्याकडून अनिल सुकेणकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच उपाध्यक्षपदी विजय दिनानी, तर सचिवपदी राधेय येवले यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून साक्षरता अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मेहता, राजीव शर्मा, सौमित्र दास आदि मान्यवर उपस्थित होते.मानव सेवेचे ब्रीद यशस्वीपणे शहरासह जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न नाशिक रोटरी क्लबचा नेहमीच राहिला आहे. यापुढेही मानवसेवा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रोटरी बांधील असल्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल सुकेणकर यांनी यावेळी व्यक्त केला. सूत्रसंचालन डॉ. श्रेया कुलकर्णी, अॅड. मनीष चिंधडे यांनी केले. येवले यांनी आभार मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
मानवतेची सेवा करण्याचा ‘रोटरी’चा संकल्प
By admin | Published: July 18, 2016 12:39 AM