खामखेडा : अपेक्षित दर न मिळाल्याने देवळा तालुक्यातील सावकी येथील धनंजय बोरसे या शेतकऱ्याने एक एकरावरील मुळा पिकावर नांगर फिरवला.बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत आहे. दर घसरल्याने केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. काबाडकष्ट करून शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने बोरसे यांनी मुळा पिकावर नांगर फिरवत पीक नष्ट केले.चालू वर्षी शेतकऱ्यांनी दोन वेळा उन्हाळी कांदा बियाणे टाकली. परंतु ते परतीच्या व अवकाळी पावसामुळे वाया गेल्याने लागवड करता आली नाही. गेल्या महिन्यात दराने उच्चांक गाठल्याने हॉटेल किंवा स्वयंपाकघरातून कांदा गायब झाला होता. याला पर्याय म्हणून हॉटेल व घरगुती जेवणात मुळ्याचा वापर वाढला होता. त्यामुळे मुळ्याला मागणी वाढली होती. चार पैसे हातात मिळतील या आशेने बहुतांश शेतकºयांनी मुळा पिकाची लागवड केली होती. परंतु कांद्याचे दर आवाक्यात आल्याने मुळ्याला मागणी घटली. सध्या मुळ्याला चार ते पाच रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यात लागवडीचा खर्चही निघणे मुश्कील झाले असल्याने किमान शेतात खत होईल, या उद्देशाने बोरसे यांनी नांगर फिरवत मुळा पीक नष्ट केले आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांत कांद्याचे दर वाढल्याने मुळ्याला मागणी वाढली होती. चार पैसे हातात पडतील या अपेक्षेने एक एकर क्षेत्रावर मुळ्याची लागवड केली होती. मात्र कांदा स्वस्त झाल्याने मुळ्याला मागणी घटली. कवडीमोल दर मिळत असल्यामुळे नांगर फिरवत मुळा पीक मोडीत काढले.- धनंजय बोरसे, शेतकरी, सावकी