झिरवाळ यांनी म्हटले आहे, सध्या धरणात २० टक्के पाणी शिल्लक असले तरी धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे प्रत्यक्ष धरणात पाणी किती टक्के आहे हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे निफाड, येवला, मनमाड तालुक्यासाठी करंजवण धरणातील पाणी आरक्षित केलेले असले तरी ज्या धरणासाठी स्थानिक जनतेच्या जमिनी दिल्या आहेत त्यांचा त्याग लक्षात घेता त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे यासाठी शासन स्तरावर बोलणी चालू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व धरणातील व नदीवरील पाणी परवानग्या बंद होत्या. या संदर्भात वारंवार बैठका घेऊन सर्व ठिकाणची पाणी परवानगी चालू करण्यात आली आहे. लवकरच तलाठ्यामार्फत सातबारा उतारे घेऊन तसेच गावा-गावांत बैठका घेऊन धरण व नदीवर सोसायटी स्थापन करणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
चालू वर्षी मांजरपाडा प्रकल्पातून ३५ टक्के पाणी पुणेगावसह ओझरखेड धरणात आले आहे. त्यामुळे या धरणांना संजीवनी मिळाली आहे. सध्या मांजरपाडा प्रकल्पाचे काम चालू असून हे काम या वर्षी पूर्ण झाले नाही तरी चालू वर्षी मांजरपाडा प्रकल्पातून १०० टक्के पाणी हे तालुक्यात येणार असल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह चादवंड, येवला, मनमाड, निफाड तालुक्याला फायदा होणार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले.
इन्फो
टप्प्याटप्प्याने पाणी सोडणार
तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्यात येणार असून पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले. दरम्यान, करंजवणसह परिसरातील गावकऱ्यांनी या लांबलेल्या आवर्तनाला कडाडून विरोध दर्शविला होता.