श्याम बागुल / नाशिकनियती कधी कोणावर सूड उगवेल आणि कधी कोणावर मेहेरबान होईल हे सांगता येत नाही. भल्याभल्यांना नियतीने सोडले नाही याची अनेक उदाहरणे देता येतील. सामान्यांवर नियतीने केलेल्या आघाताची फारशी चर्चा होत नसली तरी, अशाच सामान्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांवर नियती कणभर का होईना अधिकच रूष्ट होत असते तर काहींची भरभरून परतफेड करते. फार काही लांब जाण्याची गरज नाही आपल्या अवतीभोवतीच असलेल्या एकेकाळी मातब्बर म्हणून गणले जाणारे नियतीच्या दृष्टचक्रातून सुटले नाहीत. उदाहरणच द्यायचे तर राज्याचे हेवीवेट नेते छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी महापौर दशरथ पाटील, माजी आमदार वसंत गिते आणि अलिकडच्या काळात पक्षांतराचा विक्रम करणारे माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी मंत्री बबन घोलप अशांचे देता येईल.
उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांच्यावर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नियतीने सहा वर्षापुर्वी सूड उगविला. त्यांच्याबरोबर माजी खासदार समीर भुजबळ हे देखील भरडले गेले. भुजबळ संपले अशी हाळी ठोकण्यात आली. काळ बदलला पुन्हा याच नियतीने भुजबळ कुटुंबियांना न्याय दिला व भुजबळ पुन्हा राजकारणात प्रस्थापित झाले. साहजिकच समीर यांना देखील अभय मिळाले. माजी खासदार देवीदास पिंगळे यांना देखील नियतीने अगोदर भरभरून दिले त्यांच्या आलेख असाच काहीसा चढता राहिला. स्थानिक स्वराज्य संस्थेत नवख्या असलेल्या राष्टवादीच्या एकमेव सदस्याच्या बळावर विधान परिषदेच्या निवडणूकीत पिंगळे यांनी बहुसदस्यीय संख्याबळ असलेल्या पक्षाचा 'किमया' करून पराभव करून विधीमंडळाच्या पाय-या चढल्या. बाजार समितीचे सभापतीपद, पाठोपाठ खासदारकीही अलगद खिशात घालून दिल्लीही गाठली. त्यानंतर मात्र त्यांच्यातील 'अहमपणा' बहुधा नियतीला पसंत पडला नाही व सूड सुरू झाला. बाजार समितीतून त्यांना पायउतार व्हावे लागले. राजकारणातून विजनवास पत्करावा लागला. नियतीच्या पुढे कोणाचे नाहीच चालत नाही याचा पिंगळेंना चांगलाच अनुभव आला आणि नियतीच्या मेहेरबानीची वाट पहात पिंगळे गप्प बसले. नियती पुन्हा त्यांच्यावर मेहेरबान झाली. जेथून त्यांनी राजकारणाची सुरूवात केली त्याच बाजार समितीत त्यांची पुन्हा वर्णी लागली. साध्या एका वॉर्डाचे नगरसेवक राहिलेले दशरथ पाटील यांच्यावर नियतीने भरभरून प्रेम केले. महापौरपदाची त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली व त्यांनीही गाजवली. पक्षानेही नियतीप्रमाणे त्यांच्यावर मेहेरबानी करीत लोकसभेची उमेदवारी दिली. तिकीट मिळाले म्हणून विजय निश्चित झाला असे समजून पाटील हवेत गेले. नियतीला विसरले आणि पराभूत होवून पुन्हा जमीनीवर आले. त्यानंतर मात्र त्यांनी सावरण्याचा बराच प्रयत्न केला. पक्षांतर करून पाहिले, अपक्ष ताकद अजमावली परंतु अजुनही नियती त्यांच्यावर प्रसन्न झालेली नाही. त्यांच्याच वाटेवरून निघालेले वसंत गिते यांची अवस्था त्यापेक्षा काही चांगली नव्हती. नगरसेवक, महापौर, मनसेचे आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून गिते यांना नियतीने साथ दिली व त्यांच्या नावापुढे अनेक बिरूदे लागली. सत्ता व लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या गिते यांनीही आपली धुंदी कायम ठेवत नियतीचा विचार केला नाही. परिणामी त्यांचीही धुंदी उतरली. हातचे सारेच गेले आज गिते कोठे आहेत असा प्रश्न विचारला जातो तो याच मुळे.
आज पुन्हा अशाच नियतीच्या फे-यात सापडले ते माजी आमदार बाळासाहेब सानप आहेत. भाजपाचे तब्बल तीस वर्षे कार्यकर्ते असलेल्या सानप यांनी नगरसेवक, उपमहापौर, महापौर, आमदारकी, शहराचे अध्यक्षपद भुषविले ते नियतीच्या मेहेरबानीमुळेच. भाजपाचे सर्वेसर्वा म्हणून घेणारे ते स्वयंघोषीत नेते झाले. पक्षाचे व महापालिकेची सारी सुत्रे त्यांनी आपल्या कवेत घेत मागे फिरून न पाहण्याची वृत्ती जोपासली. आमदार असताना मंत्रीपदाचे स्वप्न त्यांना दररोज पडू लागली, एवढेच नव्हे तर मला नाही तर कोणालाच नाही अशा प्रकारे नियतीलाच अव्हेरन्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्यावरच उलटला. पक्षाने तिकीट नाकारले, त्यातून पक्षही सुटला. सहकाऱ्यांनी साथ सोडली. रातोरात दुस-या पक्षाशी घरोबा करावा लागला आणि नवीन घरोब्याशी फारशी ओळखपाळख झालेली नसताना पुन्हा दुस-या पक्षात उडी घेतली. आज सानप कोणत्या पक्षात अशी विचारणा करण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली. सानप आता पुन्हा स्वगृही परतण्यासाठी धडपड करीत असल्याची चर्चा होत आहे. परंतु पक्षाच्या काही नतदृष्ट(?)कडून त्यालाही विरोध केला जात आहे. बहुधा नियती सानप यांच्या विरोधकांच्या बाजुने न्याय देण्यास उभी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकूणच काय नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही हेच यातून सिद्ध होत आहे.