उपनगर : उपनगर नाका येथे सिग्नल यंत्रणा बसवावी, याकरिता उपनगर नाका चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सिग्नलसाठी रस्ता खोदून व काहीकाळ रास्ता रोको आंदोलन केले.नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर ते गांधीनगर दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याकडे पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा, वाहतूक पोलीस हे दुर्लक्ष करीत आहेत. दुभाजकांना रंगरंगोटी करावी, रिफ्लेक्टर लावण्यात यावे, बंद पथदीप सुरू करण्यात यावे, उपनगर नाका येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, उपनगरनाका येथून जयभवानी रोडकरिता होणारी रॉँगसाईड वाहतूक बंद करण्यासाठी कडक कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपनगर नाका येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यास सुरुवात केली. नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, भाऊसाहेब काटकर, उपनिरीक्षक साईप्रसाद चन्ना, सुजित मुंडे आदिंसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढत त्यांना रस्त्यातून बाजूला केले. त्यानंतर हळूहळू खोळंबलेली वाहतूक पूर्ववत सुरू झाली. आंदोलनामध्ये रवि पगारे, राहुल सोनवणे, मोहन पवार, ललित पाटील, मुनाफ तडवी, प्रवीण नवले, अमित शुक्ल, नितीन जाधव, संदीप केदारे, विक्रम कदम, नीलेश सहाणे नितीन पंडित, प्रीती भालेराव, माधुरी भोळे, विजय सोमवंशी, बापूसिंग पाटील आदिंसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)
रस्ता खोदो आंदोलन
By admin | Published: December 09, 2015 11:25 PM