नाशिक : चार वर्षे आपसात भांडले आणि आता एक झाले तर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला विचारत नाही, असा आक्षेप रिपाइं आठवले गटाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच युतीला धडा शिकवण्यासाठी नाशिक जिल्ह्णातील दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उभा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.गंगापूर रोडवरील एका हॉटेलात शनिवारी (दि.३०) जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये वरील मागणी करण्यात आली. ती पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असून, ४ एप्रिल रोजी ते याबाबत निर्णय देतील, असे लोंढे यांनी सांगितले.मागच्या लोकसभा निवडणुकीपासून रिपाइं आठवले गट युतीबरोबरच आहे. परंतु विधानसभेनंतर शिवसेना-भाजपात वाद सुरू झाले. साडेचार वर्षे दोन्ही पक्ष आपसात भांडत होते. परंतु आता पुन्हा युती झाल्यानंतर मात्र ते रिपाइंला विचारेनासे झाले आहेत, असा कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे.त्यातच २ मार्च रोजी पक्षाचे नेते आणि केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांची सभा असतानाही युतीचे नेते तेथे फिरकले नाहीत आणि त्यानंतर भाजपा सेनेचा मनोमीलन मेळावा झाला. त्यासाठीही रिपाइं आठवले गटाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात आता स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता स्वतंत्र उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपाइं आठवले गट दोन्ही मतदारसंघांत लढणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:23 AM