नाशिक : गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या योजनेतील धान्य वाटपासाठी रेशन दुकानदारांना प्रतिक्ंिवटल १५० रुपयांचे कमिशन दिले जाणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील २६०० दुकानदारांना होणार आहे. सदर कमिशन हे दुकानदारांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याने दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील नागरिकांना प्रतिव्यक्ती पाच किलो याप्रमाणे तांदूळ वितरित केला. रेशन दुकानदारांच्या माध्यमातून तांदळाचे वाटप करण्यात आले. दुकानदारांना धान्य वाटपाचे प्रतिक्विंटल १५० रुपये कमीशन हे दिलेच जाते. केंद्राकडून आलेल्या अतिरिक्त तांदळाचे वाटप करण्यात आल्याने त्याचेही कमिशन मिळावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनांनी केली होती. रेशन दुकानदारांनी पुकारलेल्या संपात प्रलंबित कमिशनचादेखील महत्त्वाचा मुद्दा होता.कोरोनाच्या काळात काम करताना ५० लाखांचे विमाकवच मिळावे, यासाठी रेशन दुकानदार संघटनेने संप केला होता. त्यात अन्नधान्य वाटपाचे प्रलंबित मार्जिन त्वरित अदा करावे ही प्रमुख मागणी होती. शासनाने ही मागणी पूर्ण केली असून, राष्ट्रीय अन्नसुरक्षेअंतर्गत एप्रिल ते जून या कालावधीत वाटप केलेल्या अन्नधान्याचे कमिशन त्वरित अदा केले जावे, असे आदेश अन्नपुरवठा विभागाने दिले आहे. रेशन दुकानदारांनी केलेल्या रेशन वाटपानुसार १५० रुपयांचे कमिशन दिले जाणार आहे.
रेशन दुकानदारांना १५० रुपये कमिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:40 PM