लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील 2163 आयकर भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत जमा झालेला निधी परत वसूल केला जाणार आहे. सिन्नरच्या तहसील विभागाने शेतकऱ्यांकडून निधी वसुलीला सुरुवात केली असून दोन कोटी 50 लाख रुपये पुन्हा मिळविले जाणार आहेत.पंतप्रधान किसान योजनेचा लाभ बनावट शेतकरी लाभार्थ्यांनी घेतल्याचे व मोठ्या प्रमाणावर निधीला गळती लागल्याचे उघड झाल्यावर केंद्र सरकारने आता देशव्यापी चौकशीचे आदेश दिले आहेत. तामिळनाडूत या योजनेतील मोठा घोटाळा उघडकीस आला होता. लाभार्थी हा खरोखरच शेतकरीच आहे याची प्रत्यक्ष खातरजमा करून घेण्यास राज्य सरकारांना केंद्र सरकारने सांगितले आहे.केंद्र सरकारने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढले होते. त्यानुसार तालुकास्तरावर आयकर धारक शेतकऱ्यांसह मयत, चुकीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जात आहे. त्यानुसार तालुक्यातील 2163 शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचे काम करण्यात येत आहे. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च या महिन्यांच्या कालावधीत समान हप्त्याने सहा हजार रुपयांचा लाभ पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात येतो. 2019 ला सुरू झालेल्या या योजनेद्वारे आत्तापर्यंत किमान दहा हजार रुपये लाभ खात्यांवर जमा झाला आहे. वसूल रक्कम जमा करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे.चौकट-'एकही पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये असे शासनाचे धोरण आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे इतर साधन आहे त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये. आयकर भरणारे शेतकरी आधार लिंक मुळे समोर आले आहेत. त्यांची यादी तयार असून त्यांना नोटिसा बजविण्यात येत आहे. या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यावर आलेला निधी त्वरित तहसील कार्यलयात भरावा.राहुल कोताडे, तहसीलदार, सिन्नरस्वतंत्र वसुली कक्षाची स्थापनाअपात्र शेतकऱ्यांकडून निधी परत वसूल करण्यासाठी तहसीलदार राहुल कोताडे यांनी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे. अव्वल कारकून सी. बी. मरकड, कृषी पर्यवेक्षक डी. एस. डेंगळे, कृषी अधिकारी आर. एस. पवार यांची कक्ष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निधी वसुलीचे व्यापक काम असल्याने कक्षामार्फत स्वतंत्र कामकाज चालणार आहे.