चांदवड : तालुक्यातील भोयेगाव येथील विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखला घेताना विकास निधीच्या नावाखाली २५० रुपये घेतले. या प्रकरणाची चौकशी करावी व या पैसांचा हिशेब द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारोती ठोंबरे यांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. भोयेगाव येथे इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे. इयत्ता आठवीत गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला विद्यालयात नाव दाखल करण्यासाठी आवश्यक असल्याने प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून २५० रुपये शिक्षण निधीच्या नावाने वसूल केले. एकीकडे शेतकरी वर्ग दुष्काळाच्या दृष्टचक्रात असताना एवढे पैसे वसूल करणे कितपत योग्य आहे. इतर शाळांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अवघे ५० रुपये घेतले जातात. मग शाळा सुधार निधीसाठी विद्यार्थ्यांना का अडवले जाते ? असा सवाल ठोंबरे यांनी निवेदनात केला आहे. शालेय समितीने गावकऱ्यांना कधीच पैशांचा हिशेब दिलेला नाही. विद्यार्थ्यांना २५० रुपयांची पावती दिली नाही. त्यामुळे शाळेतील सर्व हिशेब तपासावेत व या प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी मारोती ठोंबरे यांनी केली आहे. ( वार्ताहर)
शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी २५० रुपये
By admin | Published: June 26, 2016 11:53 PM