निफाड : येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत निफाड उपविभागात अनधिकृत वीजवापर करणाऱ्या ३२ ग्राहकांकडून ३,३०,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. निफाड उपविभाग अंतर्गत अनधिकृत क्षमतेपेक्षा जास्त वीज वापरामुळे रोहित्र केबल जळणे, बॉक्स, फ्युज खराब होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अधिकृत नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकास विनाकारण कमी दाबाचा विद्युत पुरवठा, विजेपासून वंचित राहण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत, वीज वितरण कंपनीचे नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, चांदवडचे कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, निफाडचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे धडक पथक तयार करण्यात आले. पथकात गुणवत्ता व नियत्रक सहायक अभियंता, आनंदा मोरे, कक्ष अभियंता गणेश कुशारे, राहुल पाटील, कुमारी पूजा वाळूंज व कु.गायत्री चव्हाण व जनमित्र यांचा समावेश होता. या पथकाने निफाड उपविभागात अनधिकृतपणे वीजवापर करणाऱ्या ३२ ग्राहकांच्या घरी धडक कारवाई केली. ३२ वीजग्राहक अनधिकृतपणे वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. या ३२ अनधिकृत वीज वापर करणाऱ्या वीजग्राहकांवर एकूण ३,३०,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. या दंडाची रक्कम निर्धारित वेळेत न भरल्यास, विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनधिकृत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांना ३,३०,००० रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:17 AM