मालेगाव : व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील सूतव्यापारी अशोक पटणी व अभिषेक पटणी यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी संदीप दीनदयाल मंडावेवाला (मामा) यांनी अशोक मणीलाल पटणी व अभिषेक अशोक पटणी यांच्या विरुद्ध फौजदारी न्यायालयात तक्रार दिली. संशयित आरोपींनी ३६ लाख ८९ हजारांचा पॉलिस्टर सुताचा माल उधारीने विकत घेऊन सदर मालाची परस्पर विक्री करीत पैसे हडप केले. या प्रकरणी संदीप मंडावेवाला यांची फसवणूक केली, अशी फिर्याद न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाने किल्ला पोलीस ठाण्यास चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संशयित आरोपी अशोक पटणी व अभिषेक पटणी तसेच या प्रकरणाशी संबंधित १२ जुलै २०१२ रोजी नोटरी अॅड. ए. ए. मन्नान यांच्या समक्ष नोंदवून दिलेला करारनामा व त्यावरील सर्व साक्षीदार यांच्याकडे चौकशी करुन जबाब नोंदविले व पोलिसांनी आपला अहवाल न्यायालयात सादर केला. संदीप मंडावेवाला व त्यांचे साक्षीदार राजेश मालपाणी यांनीही त्यांचा जबाब न्यायालयात दिला. न्यायालयात समक्ष आलेले लेखी व तोंडी पुरावे, नोटरी करारनामा व इतर पुरावे तपासून दि. १७ आॅगस्ट २०१६ रोजी ज्युनि. मॅजि. वर्ग १ व २ यांनी संशयित अशोक व अभिषेक पटणी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचा सबळ पुरावा आल्यामुळे आदेश पारित केला. न्यायालयासमक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. फिर्यादी मंडावेवाला यांच्यावतीने अॅड. सुधीर अक्कर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
मालेगावी सूतव्यवहारात ३७ लाखांची फसवणूक
By admin | Published: August 21, 2016 1:12 AM