लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून जगभर कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी नाशिक जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेला पेठ तालुका जवळपास जुलै महिन्यापर्यंत कोरोनापासून दूरच राहिला. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आमदार नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याशी सतत संपर्क साधून कोरोनाच्या उपाययोजनात विविध शासकीय योजनांसह आढावा बैठकांद्वारे सक्रिय सहभाग नोंदविला.
कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीच ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असून शिवाय पेठ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटसाठी अजून १ कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत झिरवाळ यांच्या प्रयत्नातून इनामबारी आश्रमशाळा, करंजाळी व पेठ येथील वसतिगृहात कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली तसेच ग्रामीण रुग्णालय पेठ येथे २१ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याने गावोगावी आरोग्य यंत्रणेकडून लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.
लोकसहभागाला चांगला प्रतिसाद
मार्च महिन्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली असतांना आपत्कालीन आढावा बैठकीत केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक हित लक्षात घेऊन लोकसहभाग ऊभा करावा, असे आवाहन नरहरी झिरवाळ यांनी केले. या आवाहनाला तालुक्यातील यंत्रणेने भरभरून प्रतिसाद देत लाखोंचा निधी उभारला. त्यातून ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार असून तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी जमा केलेल्या १५ लाखांच्या लोकवर्गणीतून तालुक्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहे. सोशल नेटवर्किंग फोरम या सामाजिक संस्थेने ही कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या १ हजार आशा, अंगणवाडी व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप केले. आमदार झिरवाळ यांच्या मध्यस्थीने ग्रामीण रुग्णालयास जम्बो जनरेटर प्राप्त झाले असून शासकीय निधीतून रुग्णवाहिका मिळाली आहे.
इन्फो...
आढावा बैठकाद्वारे उपाययोजना
पेठ तालुक्यातील कोविडची परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला विभागप्रमुखाची आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्यात आल्या, शिवाय कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयास वारंवार दिलेल्या भेटीतून विविध तक्रारी व समस्यांचे निराकरण करणे शक्य झाले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर व तहसीलदार संदीप भोसले यांच्या माध्यमातून सर्वच यंत्रणा सतर्क राहिल्याने कोरोनाची लढाई लढता आली. जनजागृतीवर भर पेठ तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात नागरिक लसीकरण करून घेत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर झिरवाळ यांनी स्वतः गावोगाव जाऊन जनजागृतीवर भर दिला. सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यासह गावातील सुशिक्षित तरुणांच्या सहभागाने थांबलेल्या लसीकरण मोहिमेला गती मिळाली. समाजमाध्यमांचा योग्य वापर करून स्थानिक बोलीभाषेत लसीकरणाबाबत केलेले आवाहन फायदेशीर ठरले.
इन्फो...
निधी मंजूर - ५० लाख
ऑक्सिजन प्लॉटसाठी नियोजन - १ कोटी
ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड - २१
सुरक्षा साहित्याचे वाटप - १ हजार
शिक्षकांनी जमविलेली लोकवर्गणी - १५ लाख
कोट...
पेठ तालुक्याची लोकसंख्या साधारण १ लाख ३२ हजारांवर असून वाडीवस्तीवर जनतेचे वास्तव्य असल्याने कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात राहू शकली. सर्व शासकीय विभागांना सोबत घेऊन उपाययोजना सुरू आहेत. मध्यंतरी ऑक्सिजनचा भासलेला तुटवडा व त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी पेठ येथे दीड कोटींचा प्रकल्प उभा करण्याचे नियोजन सुरू आहे.
- नरहरी झिरवाळ, आमदार पेठ -दिंडोरी