वणी : निर्यातबंदीनंतर उत्पादकांमध्ये नाराजी पसरली असून कांदा दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. वणी -कांदा निर्यातबंदीचा निर्णय केन्द्र सरकारने घेतल्यानंतर त्याचा प्रतिकुल परिणाम कांद्याच्या दरावर पडल्याने उत्पादकांमधे नाराजीचा सुर उमटतो आहे.गेल्या आठवडाभारापासुन कांदा दरात दरप्रणालीबाबत स्थिरतेचे वातावरण होते सोमवारी तर ३५०० रुपये क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाल्याने उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरवाढीचे संकेत प्राप्त होत असतानाच निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. केन्द्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केल्याने प्रतिकुल परीणाम खरेदी विक्री व्यवहारप्रणालीवर झाला. सोमवारच्या तुलनेत कांद्याचे दरही घसरले होते. २८० वाहनामधुन पाच हजार क्विंटल कांद्याची आवक उपबाजारात झाली. २९५१ कमाल, १८०० किमान तर २३५० रुपये सरासरी असा दर चांगल्या प्रतीच्या कांद्याला मिळाला. गोल्टी कांद्याला २३०१ कमाल, १३०० किमान तर १८०० रुपये सरासरी प्रति क्विंटल असा दर मिळाला. दक्षिण भागातील राज्य व बिहारमधे प्रचंड पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने कांद्याला मागणी वाढलेली आहे व त्यामुळे दराबाबत सकारात्मक स्थिती असतानाच निर्यातबंदी जाहीर झाल्याने उत्पादक अस्वस्थ झाले तर व्यापारीवर्गाचा हिरमोड झाला.कारण परदेशातही कांद्याला मागणी असल्याने निर्यातदार व्यापारीही खरेदी विक्री च्या गतिमान व्यवहार प्रणालीला अग्रक्रम देत होते .