येवला : तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या एकूण ३० शाळांमध्ये आरटीई अंर्तगत २७२ विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रवेशासाठी निवड झाली आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर तपासणी समिती गठीत करण्यात आली होती, परंतु कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी कागदपत्रे तपासणीचे अधिकार शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे पालकांची गर्दी टाळण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी शालेय स्तरावर होणार आहे.ज्या विद्यार्थ्यांची 25 टक्के प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्यांच्या पालकांनी निवड झालेल्या शाळेत आपली आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. यासाठी पालकांनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या दोन सत्यप्रति शाळेत सादर कराव्यात व लेखी हमीपत्र लिहून द्यावे. २५ टक्के आरटीईचे प्रवेश देतांना शाळांमध्ये गर्दी होणार नाही अशा पद्धतीने शाळांनी नियोजन करावे व ज्या भागात कन्टेंन्मेंट झोन जाहीर करण्यात आलेला आहे त्या भागातील शाळांनी झोन हटवल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आवाहन शिक्षण विभागा कडून करण्यात आले आहे.
येवला तालुक्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ २७२ विद्यार्थ्यांची निवड : शालेय स्तरावर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 6:15 PM